(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navi Mumbai News : पडीक इमारतीत जाऊन पार्टी करणं जीवावर बेतलं, सातव्या मजल्यावरुन पडून तरुणीचा मृत्यू
Navi Mumbai News : पडीक इमारतीमध्ये जाऊन पार्टी करणं नवी मुंबईतील एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. अंधारात अंदाज न आल्याने तरुणीचा तोल जाऊन सातव्या मजल्यावरुन पडून तिचा मृत्यू झाला.
Navi Mumbai News : पडीक इमारतीमध्ये जाऊन पार्टी करणं नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. अंधारात अंदाज न आल्याने तरुणीचा तोल जाऊन ती सातव्या मजल्यावरुन कोसळली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी पोलिसांनी या प्रकरणी तिच्यासोबत दारु पित बसलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. यापैकी एक तरुण तिचा बॉयफ्रेण्ड असून दुसरा त्यांचा कॉमन फ्रेण्ड आहे. तरुणी खरंच पडली की तिची हत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
नेमकं काय घडलं?
नवी मुंबईतील एनआरआय पोलीस ठाण्यात हद्दीत बेलापूरमधील सेक्टर 15 मध्ये काल (8 जून) संध्याकाळी ही घटना घडली. एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. मृत तरुणी ही मूळची पनवेल इथली आहे. ती मागील दोन दिवसांपासून आपल्या मित्राच्या घरी राहत होती. काल मित्राने त्याच्या मित्राला घरी बोलावून पार्टी करण्याचा बेत आखला होता. परंतु घरात आई येईल या भीतीने तिघांनी बाहेर जाऊन पार्टी करण्याचा बेत केला. मग बेलापूरमधील एका पडीक इमारतीच्या सातव्या मजल्यावर जाऊन पार्टी तिघे जण बिअर पित होते. यावेळी तिचा प्रियकर लघुशंकेसाठी उठला. त्यानंतर तरुणीही त्याच्या मागे जात होती. परंतु अंधारात अंदाज न आल्याने तरुणीचा तोल जाऊन ती सातव्या मजल्यावरुन खाली पडली. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला आहे.
तरुणीसोबत दारु पिणारे दोन्ही तरुण ताब्यात
या घटनेची माहिती मिळताच एनआरआय पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मयत तरुणी बिअरची बॉटल प्यायली. त्यामुळे तिचा पाय घसरुन तोल गेल्याने ती पडली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र पोलिसांनी तिच्यासोबत दारु प्यायला बसलेल्या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं असून दोघांचीही कसून चौकशी सुरु आहे. सातव्या मजल्यावरुन तोल जाऊन ती पडल्याचा दावा या दोन्ही तरुणांनी केला आहे.
तरुणीचा बॉयफ्रेण्ड हा बेलापूरमधील डी-मार्ट मॉलमध्ये काम करतो तर त्यांचा कॉमन फ्रेण्ड हा कामोठेमधील ह्युंदाई शोरुममध्ये काम करतो. "मृत तरुणी आणि तिचा प्रियकराचे लवकरच लग्न होणार होते. त्यांच्या आई-वडिलांनीही लग्नाला होकार दिला होता. त्यामुळे तिचं प्रियकराच्या घरी येणं-जाणं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अपघाती मृत्यू की हत्या, तपास सुरु
खरंच तरुणी तोल जाऊन पडली की तिची हत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशी येथील एनएमएमसी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या तरुणीने बिअरचे सेवन केलं होतं की नाही हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र पडीक इमारतीत जाऊन पार्टी करणे तिच्या जीवावर बेतलं आहे.