(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Orange News : वाशी मार्केटमध्ये संत्र्याची आवक वाढली, नागपूरच्या संत्र्याला ग्राहकांची पसंती
नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूरच्या संत्र्याची (Nagpur Orange) आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्र्यांला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
Orange News : गेल्या काही दिवसापासून नवी मुंबईच्या एपीएमसी (APMC) मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्याची (Orange) आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्र्यांला (Nagpur Orange) ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्यामुळं आवक वाढली आहे. दरम्यान, अचानक आवक वाढल्यानं संत्र्याच्या दरात घसरण झाली आहे. एपीएमसीत राजस्थानमधून (Rajasthan) देखील संत्र्याची आवक होत आहे. राजस्थानमधून जरी संत्र्यांची आवक होत असली तरी नागपूरी गोड संत्र्यांला ग्राहक पसंती मिळत आहे.
फळ मार्केटमध्ये दिवसाला जवळपास 40 गाड्यांची आवक
एपीएमसी फळ मार्केटमध्ये दिवसाला जवळपास 40 गाड्या भरून संत्र्याची आवक होत आहे. यामध्ये नागपूर, अहमदनगर आणि राजस्थानमधून संत्रा एपीएमसीमध्ये दाखल होत आहे. येणाऱ्या आवकेपैकी 60 टक्के आवक ही नागपूरमधून येत आहे. एपीएमसीत राजस्थान मधून संत्रा येत असला तरी नागपूरी गोड संत्र्यांला ग्राहक पसंती देत आहेत. सद्या एपीएमसी मार्केट मध्ये संत्र्याचा किलोला 35 ते 50 रुपये किलो आहे. डिसेंबरमध्ये संत्रा आवक जास्त वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत
नागपूर आणि अमरावती हे दोन जिल्हे संत्र्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, येथील संत्री उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर छोट्या आकाराची संत्री फेकून देण्याची वेळ आली आहे. बांगलादेशने भारतीय संत्र्यांवरील आयात शुल्क (Import duty) वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊनही त्याचा पुरवठा कमालीचा घटला आहे. चांगल्या मात्र आकाराने छोट्या संत्र्यांना कोणीच खरेदीदार नसल्यानं शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली आहे.
शेतकऱ्यांवर संत्री फेकून देण्याची वेळ
संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी सध्या छोट्या आकाराची संत्री फेकून देत आहेत. बांगलादेशने भारतातून त्यांच्या देशात आयात होणाऱ्या संत्र्यांवरील आयात शुल्क वाढवले आहे. त्यामुळं बांगलादेशात वैदर्भीय संत्री महाग होऊन त्यांचा पुरवठा कमालीचा घटला आहे. विदर्भातून रोज 200 ट्रक संत्रा बांगलादेशला जात होता, आता फक्त 20 ट्रक संत्रा बांगलादेशात जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी सांगितली. रोज 180 ट्रक संत्रा भारतातील बाजारपेठेत अतिरिक्त राहत असल्यानं छोट्या आकाराच्या संत्र्याला कोणीही खरेदीदार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं तोडणीमध्ये निघणारा छोट्या आकाराचा संत्रा शेतकरी आणि व्यापारी रस्त्याच्या काठावर फेकून देत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: