एक्स्प्लोर
धारणकरांच्या आत्महत्येला प्रशासन जबाबदार नाही : तुकाराम मुंढे
धारणकर मार्च महिन्यापासून 45 दिवस सुट्टीवर होते, तसेच त्यांनी तणावाची कोणतीही तक्रार दिलेली नव्हती, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं.
नाशिक : नाशिक महापालिकेचे सहाय्यक अधीक्षक संजय धारणकर यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आयुक्त तुकाराम मुंढे यांनी फेटाळला आहे. धारणकर मार्च महिन्यापासून 45 दिवस सुट्टीवर होते, तसेच त्यांनी तणावाची कोणतीही तक्रार दिलेली नव्हती, असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं.
संजय धारणकर यांनी गुरुवारी आत्महत्या करत आपण कामाच्या तणावामुळे जीवनयात्रा संपवत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवली. विशेष म्हणजे दीर्घ रजेनंतर ते नुकतेच कामावर रुजू झाले होते. ते नसताना त्यांचा चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिलेला होता.
एबीपी माझाने तुकाराम मुंढे यांच्याशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत करुन या प्रकरणावर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.
“कामाचा ताण होता हे म्हणणं चुकीचं”
"धारणकर यांच्यावर तणाव होता अशी कोणतीही माहिती किंवा तक्रार त्यांनी आजपर्यंत प्रशासनाकडे केलेली नाही. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत ते 45 दिवस सुट्टीवर होते, यादरम्यान अमरनाथ यात्रेलाही ते गेले होते, सुट्टीच्या काळात त्यांच्या कामाचा दुसऱ्याकड़े चार्ज दिला होता. एवढे दिवस सुट्टीवर होते, त्यामुळे कामाचा ताण होता हे म्हणणंच चुकीचं आहे," असं तुकाराम मुंढे म्हणाले.
“कोणत्याही परिस्थितीत प्रशासन जबाबदार नाही”
"गेल्या सहा महिन्यांपासून आपण कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची काम करण्याची क्षमता वाढावी त्यासाठी कार्यशाळाही घेत आहोत. नियमानुसार रोज 14 फाईलवर काम होणं अपेक्षित असतं, पण धारणकरांकडे सहा ते सातच्यावर फाईल नव्हत्या. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत याला प्रशासन जबाबदार नाही,'' असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिलं.
''आपलं काम आपण शिस्तीने, व्यवस्थित आणि वेळेत केलं तर तणाव येणार नाही. कोणीही या प्रकरणाचं राजकीय भांडवल किंवा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे प्रशासनावर कुठलाही दबाव येणार नाही,'' असं आवाहनही तुकाराम मुंढे यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement