बलात्काराचा आरोप असलेल्या पीएसआयची पुण्यात आत्महत्या
साजन सानपनं आज सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवलं. सानपवर नाशिक रोडच्या पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून तपास सुरु होता.
नाशिक : बलात्काराचा आरोप असलेल्या मुंबईतील पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. साजन सानप असं या पोलिस उपनिरीक्षकाचं नाव असून तो आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
साजन सानपनं आज सकाळी पुण्यातील संगम पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आपले आयुष्य संपवलं. सानपवर नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात एका महिलेच्या तक्रारीवरुन बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा नाशिक पोलिसांकडून तपास सुरु होता.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, साजन सानप 31 मे 2014 पासून महिलेला त्रास देत होता. सानपनं अनेकदा महिलेवर अत्याचार केले होते. याशिवाय महिलेने त्याला विरोध केल्यास तुझ्या नवऱ्याला मी ठार मारेल, तसेच तुझे खाजगी फोटो फेसबुकवर शेअर करुन तुझी बदनामी करेल, अशी धमकी सानप देत असे, असा आरोपही महिलेने केला आहे. सानपचा एक साथीदार देखील त्याला मदत करत होता.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक साजन सानपसह त्याच्या साथीदारावर बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. मात्र त्यानंतर साजन सानपनं पुण्याला संगम पुलाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. सध्या नाशिक पोलिसांचं पथक पुण्याला दाखल झालं असून पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, सानपनं आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय? हे अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.