एक्स्प्लोर
बी कॉम चोरट्यांची हायटेक चोरी, 'जस्ट डायल'वरुन नंबर मिळवून डल्ला
उमरखान फैसल खान आणि अब्दुला मुस्तकीन अशी या दोघांची नावं आहे. या दोघांच्या चोरी करणाच्या आयडियाची कल्पनाच आपण करु शकत नाही.

नाशिक: नाशिक पोलिसांनी अशा दोन चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत ज्यांची चोरी करण्याची पद्धत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. उमरखान फैसल खान आणि अब्दुला मुस्तकीन अशी या दोघांची नावं आहे. या दोघांच्या चोरी करणाच्या आयडियाची कल्पनाच आपण करु शकत नाही. हे दोघे जस्ट डायल वरुन फोटोग्राफर्सचे नंबर मिळवायचे. ज्या फोटोग्राफरकडे Nikon किंवा Canon चे कॅमेरे आणि सोबत चांगल्या लेन्सेस आहेत, त्याला लग्नाचे अर्थात वेडिंग फोटोग्राफीची ऑर्डर द्यायचे. फोटोग्राफरसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्काम करायचे आणि रात्री जेवण झाले की झोपताना शीतपेयातून त्याला गुंगीचं औषध देत कॅमेरा किटची चोरी करुन ते फरार व्हायचे.
मागील महिन्यात नाशिकच्या रविवार कारंजा परिसरातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून त्यांनी अशाचप्रकारे एका मुंबईच्या फोटोग्राफरच्या 13 लाख 81 हजार रुपयांच्या कॅमेराची चोरी केली होती. या चोरीनंतर त्यांनी धूम ठोकली होती.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्यांनी मोबाईलचे सिमदेखील बदलल्याने त्यांचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.
पोलिसांनी हॉटेलमधून सीसीटीव्ही फुटेज मिळवून, त्याआधारे तपास सुरु केला. नाशिक पोलिसांनी महाराष्ट्रासह दिल्ली पोलिसांना या चोरट्यांची माहिती दिली होती. मागील आठवड्यातच या दोघांनी देहराडूनमध्येदेखील अशाप्रकारे चोरी केल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नाशिक पोलिसांना कळवलं.
नाशिक पोलिसांचं पथक देहराडूनला दाखल झालं. विशेष म्हणजे या दोघांनी देहराडूनमध्ये 2 आणि मसुरीमध्ये 1 अशाचप्रकारे चोरी केली होती. पोलिसांना या दोघांसह त्यांचा साथीदार अमीर अलीच्याही मुसक्या आवळण्यात यश आले आहे.
यातील उमर आणि अब्दुल्ला हे मूळचे उत्तरप्रदेशचे असून अमीर हा दिल्लीचा रहिवासी आहे. या तिघांनीही दिल्ली युनिव्हर्सिटीतून बी कॉमचं शिक्षण घेतलं आहे.
यातील मास्टरमाइंड उमरखान आहे. उमरखान आधी भाड्याने इनोव्हा कार चालवत होता.ती कार चोरीला गेली. मालकाने कारचे पैसे भरून दे म्हणून त्याच्याकडे तगादा लावला, मात्र एवढे पैसे द्यायचे कुठून हा त्याच्यासमोर प्रश्न उभा होता.
उमरला कॅमेराचा छंद असल्याने त्याने त्याच्याजवळील एक कॅमेरा विकून थोडे पैसे फेडले. कॅमेरा विकून पैसे येत असल्याचं पाहून, त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने मित्रांची साथ घेऊन चोरी हाच धंदा बनवला.
सध्या हे तिघेही सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात असून त्यांच्याकडून अजून काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
राजकारण
पुणे
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
