![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल, नाशिक महापालिकेची कारवाई
कोरोनाची लक्षण असतानाही माहिती लपवल्याप्रकरणी तिघांवर नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली आहे. यामध्ये एका डॉक्टरचाही समावेश आहे.
![कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल, नाशिक महापालिकेची कारवाई Nashik Municipal Corporation takes action against three people including doctor for hiding Corona information कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल, नाशिक महापालिकेची कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/16124103/nashik-municipal-corporation.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : कोरोनाची लक्षण दिसून येत असतानाही प्रशासनापासून माहिती लपवणे नाशिकमधील एका खासगी डॉक्टरसह दोन रुग्णाना चांगलंच महागात पडलंय. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील संजीवनगर परिसरातील एका 63 वर्षीय वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं 16 एप्रिलला स्पष्ट झालं होत. विशेष म्हणजे या महिलेची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसतानाही त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. दरम्यान पुण्याहून काही दिवसांपूर्वीच घरी परतलेल्या तिच्या मुलाची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. आणि त्याला देखील कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं होतं. धक्कादायक म्हणजे या परिसरातील इतर तीन नागरिकांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. सध्या या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र शासकीय रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी अंबड लिंक रोडवरील एका खासगी रुग्णालयात संबंधित महिलेवर दोन ते तीन दिवस उपचार केले गेले होते. कोरोनाची लक्षणं दिसून येत असतानाही संबंधित डॉक्टरने याबाबत कुठलीही माहिती महापालिका प्रशासनाला दिली नाही. तसेच पुण्याच्या बाधित क्षेत्रातून आलेल्या महिलेच्या मुलाने देखील स्वतःची माहिती लपवून ठेवली आणि स्वतःला क्वॉरंटाईन न करता कोरोनाचा प्रसार केल्यानं या डॉक्टरसह कोरोना बाधित आई-मुलावर महापालिकेने साथीरोगाचा प्रसार करणे, तसेच प्रशासनापासून माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस पुढील तपास करत आहेत. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तो डॉक्टर अद्याप वैद्यकीय शिक्षण घेत असून त्याला देखील बाधा पोहोचण्याची शक्यता असल्याने डॉक्टरचेही रिपोर्ट पाठवण्यात आले आहेत. सातपूर अंबड लिंक रोड परिसरात आतापर्यंत एकूण 5 रुग्ण हे पॉझिटिव्ह सापडले आहेत. मात्र लक्षणे जाणवू लागताच जर वेळीच त्या महिलेने किंवा तिच्या मुलाने प्रशासनाला अवगत केले असते, तर हा संसर्ग रोखला गेला असता. या पाच जणांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांचे सर्वेक्षण महापालिकेकडून सुरु असून हाय रिस्क संशयितांवर आता उपचार सुरु आहेत.
तुम्ही जर कोरोनाबाधित क्षेत्रातून आला असाल तसेच कोरोनाची लक्षणं तुमच्यात दिसून येत असतील तर तात्काळ माहिती द्या, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे. मात्र जर याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्यावर कठोर कारवाई देखील होऊ शकते, असा इशारा या प्रकरणातून नाशिक महापालिका आरोग्य विभागाने दिला आहे.
- COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार
- coronavirus | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)