Nashik: पोटात एक जीव, तरीही जीवाचं रान करत दुसरा जीव वाचविला! नाशिकमध्ये महिला डॉक्टरचं सर्वत्र कौतुक
स्वतः गरोदर असतानाही वेळेची गरज ओळखून नाशिकमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याने एका तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक : दवाखाना म्हटलं आजही अनेकांच्या भुवया उंचावतात, तर अनेकजण डोक्याला हात लावतात. गेल्या काही वर्षात आरोग्य विभागाच्या कामकाजामुळे आरोग्य विभाग टीकेचा धनी झाला आहे. मात्र अनेकदा डॉक्टरांच्या समयसूचकेमुळे देवासारखे भेटले, अशा प्रतिक्रियासुद्धा ऐकायला मिळतात. नाशिकमध्ये अशाच एका देवदूत डॉक्टरवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे तरुणाचा जीव वाचल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे त्या महिला डॉक्टर या स्वत: गरोदर असतानाही त्यांनी दुसऱ्याचा जीव वाचवला आहे.
दवाखाना म्हटलं आजही अनेकजण डोक्याला हात लावतात. ग्रामीण भागात तर कधी दवाखाना बंद, तर कधी डॉक्टरच उपलब्ध नाही अशा घटना सर्रास घडताना दिसतात. मात्र या सगळ्याला निफाड तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी अपवाद ठरल्या आहेत. निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका पवार यांनी स्वतः रुग्णवाहिका चालवून रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात पोहचवून रुग्णाचा जीव वाचविला आहे. विशेष म्हणजे स्वतः गरोदर असतानाही वेळेची गरज ओळखून त्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील 22 वर्षीय तरुणाने विष प्राशन केले होते. त्यामुळे तरुणाला लवकरात लवकर उपचार मिळणे महत्वाचे होते. डॉ. पवार यांनी रुग्णाला तपासले, मात्र रुग्णाचा त्रास वाढत असल्याने त्याला निफाड ग्रामीण रुग्णालयात हलवणे महत्वाचे होते. सदर रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे प्राथमिक उपचार केले. रुग्णाला तातडीने पुढील संदर्भ सेवेची आवश्यकता असताना प्राथमिक आरोग्य केंद्र म्हाळसाकोरे येथील वाहनचालक रजेवर होते. याप्रसंगाला सामोरं जाण्यासाठी एक स्त्री त्यातही गरोदर असूनही स्वतःचा विचार न करता आरोग्य सेवक संसारे यांना सोबत घेवून रुग्णवाहिका चालविण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार त्यांनी रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय निफाड येथे तातडीने रुग्णाला पोहचवून वेळेत पुढील उपचार सुरू झाला. या कृतीबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तरुणांचे प्राण वाचले, त्याला नवा जन्म मिळाला. डॉ. प्रियंका पवार यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे आरोग्य विभागासह नातेवाईकांनी आभार मानत ग्रामीण भागात जोरदार कौतुक केले आहे. मात्र मी माझे काम केले असून रुग्णाचे प्राण वाचविणे माझं प्रथम कर्तव्य होत ते मी पार पाडल्याचे मत डॉ. पवार यांनी व्यक्त केले.
ही बातमी वाचा: