नाशिक बिटको रुग्णालय तोडफोड प्रकरण, राजेंद्र ताजणे यांच्याकडून आपल्या कृत्याचं समर्थन
राजेंद्र ताजणे यांच्या भावनांचा उद्रेक झाला. बिटको रुग्णालयामध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा, औषधं मिळत नाही, काळाबाजार होत आहे, असा आरोपी नगरसेविका सीमा ताजणे यांनी केला.
नाशिक : नाशिकमधील बिटको रुग्णालयात धुडगूस घालणाऱ्या भाजप नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी आपल्या कृत्याचं समर्थन केलं आहे. घटनेनंतर जवळपास 24 तासांनी त्यांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी काल जे केलं ते निंदनीय आहे, पण ते गरजेचं होतं असं राजेंद्र ताजणे यांनी म्हटलं.
मी चुकीचे काही केले नाही, कुणाला चुकीचे वाटत असेल तर परिणामांना समोर जायला तयार आहे. तिथे रुग्णांना चांगली वागणूक दिली जात नाही. रेमडेसिवीरचा काळाबाजार केला जातोय. आमच्या मागण्यांची दखल घेतली जात नाही. विधायक मार्गाने अनेकवेळा सांगितले पण उपयोग झाला नाही. केवळ बघतो, करतो अशी उत्तर मिळाली. जवळच्या लोकांचे मृत्यू होत आहे याला येथील स्टाफ जबाबदार आहे, असा आरोपी राजेंद्र ताजणे यांनी केला आहे.
राजेंद्र ताजणे यांच्या भावनांचा उद्रेक झाला : सीमा ताजणे
राजेंद्र ताजणे यांच्या भावनांचा उद्रेक झाला. बिटको रुग्णालयामध्ये रुग्णांना वैद्यकीय सेवा, औषधं मिळत नाही, काळाबाजार होत आहे. नगरसेवकांना देखील दाद मिळत नाही, तिथे सर्वसामान्यांचे काय. विधायक मार्गाने मागणी करूनही कारभारात फरक पडत नसल्याने त्यांचा संताप अनावर झाला. राजेंद्र ताजणे यांच्यां कृतीचे समर्थन नाही, पण उद्रेक का झाला याचा शोध घ्यावा, अशी प्रतिक्रिया नगरसेविका डॉ. सीमा ताजणे यांनी दिली.
नेमकं काय घडलं होतं?
भाजपच्या नगरसेविक सीमा ताजणे यांच्या पतीने नाशिक मनपाच्याच हॉस्पिटलमध्ये धुडघूस घालून तोडफोड करत दहशत माजवली. राजेंद्र ताजणे यांनी शनिवारी सायंकाळी इनोव्हा कार थेट मनपाच्या बिटको रुग्णालयात घुसवली होती. काचेचा दरवाजा तोडून गाडी आत शिरताच प्रचंड मोठा आवाज झाला. कर्मचारी रुग्णाचे नातेवाईक सैरभैर झाले. उपचार घेणारे रुग्ण काय घडले बघण्यासाठी बाहेर आले. ताजणे एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या सोबत आणलेला पेव्हर ब्लॉकचा तुकडा त्यांनी एका नर्सच्या दिशेने भिरकवला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. शिवीगाळ करत धुमाकूळ घालणाऱ्या राजेंद्र ताजणे यांना एका रुग्णाच्या नातेवाईकालाही मारहाण केली. यानंतर आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी, महापौर सतीश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले होते. महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेत तर प्रशासनाने नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला.