पुण्यापाठोपाठ नाशिकमध्येही फ्री पार्किंगला हरताळ, महापालिकेची नोटीस अधिकृत मानायला मॉल्स चालकांचा नकार
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवस मॉल बाहेर उभे राहून नागरिकांना पार्किंगचे पैसे भरू नका, असं आवाहनही केलं. शिवसेनच्या या कृतीचं नागरिकांनी स्वागतही केलं.
नाशिक : पुणे महापालिकेचे अनुकरण करून नाशिक महापालिकेने मॉल्समध्ये पार्किंग मोफत करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र मॉल्स चालकांनी महानगरपालिकेला पुणेरी हिसका दाखवत, कोणत्या कायद्याच्या आधारावर नोटीस पाठवली, असा जाब विचारला आहे.
नाशिक शहरात सध्या मॉल्समधील पार्किंगचा विषय चांगलाच चिघळत चालला आहे. पुणे महापालिकेने मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेतही मोफत पार्किंग करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली. त्यानंतर महासभेत नाशिकच्या महापौरांनी मॉल्समधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतला.
तसेच या नियमाचं पालन न करणाऱ्या मॉल्स चालकांना नोटीस पाठवण्यासही सुरुवात केली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काही दिवस मॉल बाहेर उभे राहून नागरिकांना पार्किंगचे पैसे भरू नका, असं आवाहनही केलं. शिवसेनेच्या या कृतीचं नागरिकांनी स्वागतही केलं.
महापौरांच्या निर्णयांनतर नाशिककर समाधान व्यक्त करत होते. मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. महापौरांनी घाईघाईत घेतलेल्या निर्णयाला सिटी सेंटर मॉल व्यवस्थापनाने आव्हान दिलं आहे. मनपाच्या नोटीसला उत्तर देताना कोणत्या कायद्याच्या आधारावर नोटीस पाठविली, असा जाबच प्रशासनाला त्यांनी विचारला आहे. त्यामुळे आता नाशिक मनपा प्रशासनाची धावपळ सुरु झाली असून कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे.
एकीकडे मनपा प्रशासन आणि मॉल्स चालक यांच्यात कायदेशीर लढाई सुरु झाली असताना शिवसेनेनंही यात उडी घेतली आहे. मोफत पार्किंगची तत्काळ अंमलबजावणी झाली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नगरसेवकांनी दिला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनासमोर पेच प्रसंग निर्माण झाला आहे.