(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : एकनाथ शिंदेंनी स्वत:चा पक्ष काढावा आणि पाच आमदार निवडून आणावेत, संजय राऊतांचं आव्हान
Sanjay Raut : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत:चा पक्ष काढावा आणि पाच आमदार निवडून आणावेत, असं आव्हान शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे.
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वत:चा पक्ष काढावा आणि पाच आमदार निवडून आणावेत, असं आव्हान शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलं आहे. आमची ताकद चोरुन तुमची ताकद दाखवू नका. हे चोरांचच सरकार असल्याचा उल्लेख राऊतांनी केला. तुमचं बंड खरं असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकांना सामोर जा मग कळेल खरी शिवसेना कोणती आणि खोकेवाल्यांची शिवसेना (Shivsena) कोणती अशी टीकाही राऊतांनी केली. ते नाशिकमध्ये बोलत होते.
राहुल गांधींवर झालेली कारवाई हा लोकशाहीवरचा आघात
काँग्रेस नेते राहुल गांधी हे परिस्थितीला सामोरं जात आहे. आम्हाला त्यांच्याविषयी प्रेम आहे. जुलमी सरकारपुढे झुकण्यास राहुल गांधींनी नकार दिला आणि त्यांनी आपलं लोकसभा सदसयत्व गमावल्याचे राऊत म्हणाले. राहुल गांधी यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली हा लोकशाहीवर आघात आहे. राहुल गांधींना बोलून द्यायचं नाही यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे राऊत म्हणाले. सध्या देशात लोकशाही राहिली नाही. विरोधी पक्षांना संपवण्याचे काम सुरु आहे. विरोधात बोलणाऱ्यांना यंत्रणांच्या माध्यमातून नष्ट करायचे काम सुरु आहे. देशात चुकीच्या पद्धतीनं राजकारण सुरु असल्याचे राऊत म्हणाले. राज ठाकरे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर कायम उद्धव ठाकरे हेच आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मोठे आहे. तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्याशिवाय दुसरा कोणता विषय सापडला नाही का? असा सवाल राऊतांनी केला.
उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जनता उत्सुक
उद्या (26 मार्च) नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला एक लाखापेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता असल्याचे संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जनता उत्सुक आहे. दोन दिवसापासून मी इकडे आहे. लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोकांचा उत्साह आहे हीच खरी शिवसेना असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्या उद्धव ठाकरे यांच्याबरोबर रश्मी ठाकरे या देखील येणार आहेत. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, नेते उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे सर्व महत्वाचे नेते देखील उद्या उपस्थित राहणार आहेत. उद्याची सभा जरी उत्तर महाराष्ट्रात असली तरी ही संपूर्ण महाराष्ट्राची सभा असेल हा संदेश महाराष्ट्राला आणि देशाला जाईल असे राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: