गुवाहाटीमधील झाडी, डोंगार, हाटील बघण्यापेक्षा आमच्या समस्याकडे लक्ष द्या; कृषीमंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी
दुबार पेरणीचे संकट ओढवेल का, खत-बियाणांच्या वाढत्या किमतीवर निर्बंध येतील का असे प्रश्न राज्यातील शेतकरी कृषीमंत्री दादा भुसे यांना विचारत आहेत. परंतु कृषीमंत्री दादा भुसे यांचा पत्ताच नाही.

नाशिक : "गुवाहाटीमधील झाडी, डोंगार, हाटील बघण्यापेक्षा आमच्या शेतातील झाडी, मातीचे ढेकळे, वावर बघा. आमच्या समस्यांकडे लक्ष द्या," अशी मागणी शेतकरी करत आहेत. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी बंडखोरी करुन गुवाहाटीमध्ये मुक्कामाला असलेल्या राज्याच्या मंत्र्यांसह आमदारांवर नाराजी व्यक्त केली आहे.
शिवसेनेतील बंडाळीनंतर नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आणि आहे ते सरकार वाचवण्यासाठी सर्वच राजकीय मंडळींची धावपळ सुरु आहे. मात्र या सत्ता संघर्षात ज्यांच्या जीवावर आपण आमदार मंत्री झालो त्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायाला कोणाकडेच वेळ नाही. पावसाळा सुरु झाला आहे. सध्याचा काळ पेरणीचा आहे, अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याने शेतातील सर्व काम रखडली आहेत. हवामान खात्याचे अंदाज पुन्हा एकदा चुकल्याने पेरणी करावी की नाही, दुबार पेरणीचे संकट ओढवेल का, खत-बियाणांच्या वाढत्या किमतीवर निर्बंध येतील का असे प्रश्न राज्यातील शेतकरी कृषीमंत्री दादा भुसे यांना विचारत आहेत. परंतु कृषीमंत्री दादा भुसे यांचा पत्ताच नाही.
नाशिकमधील मालेगाव बाह्य हा कृषीमंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ आहे. परंतु एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 35 ते 40 आमदारांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्रात राजकीय पेचप्रसंग उभा राहिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सर्वच बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघाबाहेर आहेत. या आमदारांचा सध्याचा मुक्काम गुवाहाटीमधील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये आहे. त्यातच सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, ज्यात ते गुवाहाटीमधील सौंदर्याचा आणि वास्तव्याचा अनुभव शेअर करत आहेत.
एकीकडे आमदार परराज्यात जाऊन तिथे निवांत राहत आहेत. परंतु त्याचवेळी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांसह इतर जनता आपल्या समस्या सोडवणार कोण या चिंतेत आहेत. या शेतकऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता त्यांनी कृषीमंत्र्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. गुवाहाटीमधील झाडी, डोंगर, हाटील बघण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतातील झाडी, वावर मातीचे ढेकळे, खत-बियाणे, त्यांच्या समस्यांकडे बघा, अशी अपेक्षा कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच शेतकरी व्यक्त करत आहेत.
23 जून रोजी दादा भुसे एकनाथ शिंदे गटात
राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे 23 जून रोजी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. दादा भुसे गुवाहाटीत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार संजय राठोड, आमदार रवींद्र फाटक, किनवट विधानसभा संघटक सचिन नाईक हे देखील गुवाहाटीत पोहोचले होते.























