Biroba Maharaj Yatra : पाच वर्षांच्या चिमुकलीसह दोन हजार जणांची बगाडला लटकत नवसपूर्ती!
राहात्याचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा गेल्या दोन वर्षांपासून बंद होती. यावेळी मात्र महिला-पुरुषांसह तरुणींनी गळवंतीला लटकून आपली नवसपूर्ती केली. यात पाच वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश होता.
अहमदनगर : दोन वर्ष असलेले कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच राज्यातील यात्रा जत्रांना प्रारंभ झाला. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता इथल्या वीरभद्र यात्रेत नवसपूर्तीसाठी गळवंतीला अर्थात बगाडाला लटकण्याची अनोखी परंपरा शेकडो वर्षांपासून जपली जाते. राहाता इथले ग्रामदैवत असलेल्या राजा विरभद्र उर्फ बिरोबा महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. दोन हजारांहून अधिक भाविकांनी बगाडाला लटकत आपले नवस पूर्ण केले. विशेष म्हणजे 5 वर्षांच्या चिमुकलीने सुद्धा बगाडला लटकत आपला नवस पूर्ण केल्याचं दिसून आलं.
गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधामुळे राहाता शहराचे ग्रामदैवत वीरभद्र महाराजांची यात्रा साजरी होऊ शकली नाही. मात्र गुढीपाडव्याला महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्याने शिर्डी जवळील राहाता शहरात यात्रेचा मोठा उत्साह बघायला मिळाला. शेकडो वर्षांपासून सुरु असलेली परंपरागत यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली. बिरोबा महाराज की जय, असा जयघोष करत निघालेली गळवंतीची मिरवणूक, डफांच्या तालावर नाचवलेल्या मानाच्या काठ्या, गुलालाची मुक्त उधळण, फटाक्यांची आतषबाजी असा नजारा यात्रेच्या रथ मिरवणुकीत दिसला. भाविक डफाच्या तालावर तल्लीन झाले होते.
वीरभद्र महाराजांवर लाखो भाविकांची श्रद्धा आहे नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या वीरभद्राला हजारो लोक नवस करतात आणि इच्छापूर्ती झाली की गळवंतीला (बगाड) लटकून नवसपूर्ती केली जाते. एका हत्तीची प्रतिकृती तयार करुन रथ बनवला जातो आणि रथाच्या दोन्ही बाजूला भाविकांना लटकवून फेरी पूर्ण केली जाते. गळवंतीला लटकण्यासाठी हजारो महिला-पुरुषांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे यात उच्चशिक्षित तरुणींचा मोठा सहभाग होता. गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा बंद होती. यावेळी मात्र महिला-पुरुषांसह तरुणींनी गळवंतीला लटकून आपली नवसपूर्ती केली.
महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत कधीही गळवंतीला लटकून कोणता अपघात झालेला नाही किंवा कोणी जखमी देखील झालं नाही. देवस्थान समितीच्या वतीने गळवंतीला लटकणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. दोन वर्षांनंतर यात्रा भरल्याने देवस्थान समितीने मोठ्या उत्साहात यात्रेचे नियोजन केले होते.
निर्बंधमुक्तीनंतर महाराष्ट्रात गावोगावी यात्रा जत्रांना उधाण आलं आहे. यात्रेच्या निमित्ताने सगेसोयरे भेटतात, विचारांची देवाणघेवाण घेवाण होते आणि माणसा माणसातील प्रेम आणखी वाढते. त्यामुळे गावागावातील या यात्रांमुळे ग्रामीण भागातील माणुसकी आजही टिकून आहे.