कोरोनाच्या संकटामुळे सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद होणार : पालकमंत्री छगन भुजबळ
सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळा बंद होणार असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. आज नाशिक जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. यानंतर भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तसेच या बैठकीत जिल्हा नियोजनासाठी 860 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली असून, अतिरीक्त 25 कोटींच्या निधीची वित्त मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भुजबळ यांनी दिली.
दरम्यान, आमगारांना जिल्हा परिषद निधीमधून 25 टक्के निधी दिला जाणार असल्याचेही छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी भुजबळ यांनी देशात होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांवरही प्रतिक्रिया दिली. पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, तिथली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे असे भुजबळ म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लाखोंच्या सभा झल्या आहेत. यामध्ये कोरोना नियमांची पायमल्ली झाली असल्याचे ते म्हणाले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी उत्तर प्रदेश सरकारवरही टीका केली. अनेकवेळा सत्य उशिरा बाहेर येते. गंगा नदीत प्रेत बाहेर आल्याचे फोटो दिसतात, त्यामुळे अधिकारी योग्य निर्णय घेतील असे वक्तव्य करत भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांची रेकी केली जात असल्याच्या मुद्यावरही भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरक्षा यंत्रणा सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले. अमृता फडणवीस आणि विद्या चव्हाण यांच्या वादावरही प्रसारमाध्यमांनी भुजबळ यांना प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी सांगितले की, कोणीही कोणाविषयी अपमानास्पद बोलू नये. महिलांविषयी बोलताना ट्वीट करताना काळजी घ्यावी असे यावेळी भुजबळ म्हणाले.
दरम्यान, आज कोरोना महासाथीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीची आज घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना महासाथीत निवडणुका होाणार असल्याने निवडणूक आयोगाकडून काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागासोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने बैठक घेतली होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मागील काही दिवसांपासून निवडणूक तयारीच्या अनुषंगाने सातत्याने बैठका सुरू आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यासह आयोगाकडून प्रचार सभा, रॅली यांच्याबाबत काही मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी तिथली परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे असे सांगितले आहे.