राणेंना नडले, राऊतांचे विश्वासू, कोण आहेत सुधाकर बडगुजर..?
राणे विरोधात पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार बडगुजर यांनीच हा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासूनच बडगुजर राणेंच्या टार्गेटवर होते, आज नितेश राणेंनी सभागृहात आरोप करत जुना वचपा काढत हिशोब चुकता केला
नाशिक : शिवसेना उबाठा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करून संजय राऊत याना धक्का देण्याचा प्रयत्न होतोय का? महाविकास आघाडी सरकारच्या काळात केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द काढले होते तेव्हा, राणे विरोधात पहिला गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार बडगुजर यांनीच हा गुन्हा दाखल केला होता. तेव्हा पासूनच बडगुजर राणेंच्या टार्गेटवर होते, आज नितेश राणेंनी सभागृहात आरोप करत जुना वचपा काढत हिशोब चुकता केला.
ड्रग्स प्रकरण आणि गारपीट, अवकाळी पावसाच्या मुद्यावरून नाशिकमधे उबाठा गटाने सरकार विरोधात मोर्चा काढला. त्यात महानगरप्रमुख या नात्याने सुधाकर बडगुजर यांनी भाग घेत आंदोलन यशस्वी करून दाखविले. Md ड्रग्स प्रकरणात थेट पालकमंत्री दादा भुसे यांना भिडले, त्याचा राग आज सभागृहात दादा भुसेच्या बोलण्यातून जाणवत होता. शिवसेना फुटी नंतर नाशिक महापालिकेतील कामगार संघटनेचे अध्यक्ष पद शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांच्याकडे गेले, बडगुजर यांनी त्याला हरकत घेत न्यायालयात धाव घेतली आणि अध्यक्ष पद स्वतःकडे खेचून आणले तो राग ही शिंदे गटात होता.
शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांच्यावर मागील महिन्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्वय हिरे न्यायालयिन कोठडीत जमिनीच्या प्रतीक्षेत आहे. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय. यानंतर आता सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई करून ठाकरे गटाला एका पाठोपाठ एक हादरे देण्याचा प्रयत्न सत्ताधारी शिवसेना भाजप कडून केला जातोय.
कोण आहेत सुधाकर बडगुजर..?
सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख आहेत.
- सन 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
- 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.
- त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.
- तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता.
- यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
- अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले.
- पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.
- 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला.
- गेल्या 15 वर्षा पासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर ते कार्यरत आहे.
- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातुन महाविकास आघडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे