Nashik Crime News: हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना
Nashik Crime News: हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Nashik Crime News: आनंद आणि उत्साहाचा सोहळा मानल्या जाणाऱ्या हळदीच्या कार्यक्रमात किरकोळ धक्क्यावरून सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमधील (Nashik) आडगाव (Adgaon) शिवारातील विडी कामगारनगर (Bidi Kamgar Nagar) येथे घडली. या प्रकरणात मित्रांनीच आपल्या सहकाऱ्यावर धारदार कोयत्याने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या हाताची करंगळी तुटल्याची माहिती समोर आली आहे. आडगाव पोलिसांनी या प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला असून सर्व संशयितांना अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विडी कामगारनगर येथील तन्मय शिरसाठ यांच्या घरी शनिवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला अमोल सोमनाथ जगळे (वय 35) हा उपस्थित होता. रात्री उशिरा घरासमोर गाण्यांच्या तालावर मित्रमंडळी नाचत असताना संशयित सिद्धांत उर्फ भुऱ्या वंजारी याचा अमोलला धक्का लागला. यावर “जरा व्यवस्थित नाच” असे अमोलने सांगितल्याने सिद्धांत संतापला.
Nashik Crime News: किरकोळ वादाचा राग मनात धरून बेदम मारहाण
या किरकोळ वादाचा राग मनात धरून सिद्धांतने आपल्या साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर पीयूष खाडे, चिराग गजबे आणि नितीन मरकड हे तेथे पोहोचले. या चौघांनी मिळून अमोलला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली. “याला आता सोडायचे नाही” असे म्हणत सिद्धांतने कमरेला खोचलेला धारदार कोयता काढून अमोलवर वार केला.
Nashik Crime News: जखमी तरुण पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार
अमोलने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केल्याने वार त्याच्या हातावर बसला. या हल्ल्यात त्याच्या हाताची करंगळी तुटली असून तो गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे, जखमी अमोल जगळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला शहरातून तडीपार करण्यात आले होते. त्याच्यावर हल्ला करणारे संशयित हे त्याचेच मित्र असल्याने या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करत सर्व संशयितांना अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या





















