(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Leopard : नाशिकमध्ये आठ दिवसात बिबट्यासोबत काय-काय घडलं? बछड्यांची भेट, जीवदान, रेस्क्यू अन् बरंच काही
Nashik Leopard : नाशिक शहर परिसरात मागील आठ दिवसांत बिबट्यासंदर्भात अनेक घटना समोर आलेल्या आहेत.
Nashik Leopard : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात बिबट्याचा (Leopard) वावर सुरूच आहे. कुठे शेतात, कुठे बांधावर, कधी विहिरीत तर कधी उसाच्या पाचाटात बिबटे आढळून आले आहेत. मागील आठ दिवसांत वनविभागाने बिबट्याच्या रेस्क्यूसह आई आणि बछड्यांची भेटीचा प्रसंग देखील अनुभवला. त्याच शिवाय देवळालीत एका बिबट्याच्या (Nashik Leopard) रेस्क्यूसह एकाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले.
चाडेगावात बछडे आईची भेट
नाशिकरोड परिसरातील चाडेगाव (Chandegaon) येथील भागवत मळ्यात उसाची तोडणीदरम्यान आढळून आलेल्या बिबट्याची पिल्ले 14 जुलैला पहाटे पुन्हा आपल्या आईच्या कुशीत आल्याने बिबट्या मादीने त्या बछड्यांना जिभेने कुरवाळत प्रेमाने जवळ घेतले. हा भावनिक प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. गुरुवारी दुपारच्या सुमारास चाडेगाव येथील मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळले. घटनेची माहिती समजताच वनविभागाने बछड्यांची आईबरोबर पुन्हा भेट घडवून देण्याचे ठरविले. त्यानुसार क्रेटखाली बछडे ठेवून काही अंतरावर कॅमेरा लावण्यात आला. शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास बछड्यांचा आवाज ऐकून बिबट्या मादीने बछड्यांकडे धाव घेतली. याचवेळी तिने दोन्ही पिल्लांना अलगद उचलून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना मादी कॅमेऱ्यात कैद झाली.
विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान
सिन्नर तालुक्यातील (Sinner) पास्ते येथे इसमावर हल्ला करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून चार वर्षांच्या मादी बिबट्याला बाजेच्या सहाय्याने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. पास्ते येथील राणू आईचा मळ्यात वसंत पुंजाजी आव्हाड हे त्यांच्या शेतातील विहिरीवर पाणी काढत असताना बांधाच्या आडून बिबट्या दबा धरून बसला होता. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र, वसंत आव्हाड यांनी हातातील छत्री उघडून स्वत:चा बचाव केला. हल्ला अयशस्वी झाल्याने बिबट्या पळ काढत असताना शेजारील सुभाष पुंजाजी आव्हाड यांच्या मालकी क्र. 104 मध्ये असलेल्या विहिरीत जाऊन पडला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून चार वर्षाच्या मादी बिबट्यास खाटेच्या साहाय्याने विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. मादी बिबट्याच्या पोटाला जखम असून पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
देवळालीत बिबट्या जेरबंद
आज 17 जुलै रोजी देवळाली गाव (Deolali) परिसरात पहाटे सुमारास शिंगवे बहुला येथील विठल पुंडलिक गावंडे यांच्या शेतात 4 वर्षाचा नर बिबट्या रेस्क्यू करण्यात आले आहे. सदर बिबट वन्यप्राणी वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितरित्या आहे. काही दिवसांपूर्वी शिंगवेबहुला येथील सह्याद्रीनगर येथील गावंडे यांच्या पाळीव कुत्र्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला होता. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन याठिकाणी पिंजरा लावला होता. आठ दिवसांपूर्वी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबट्या जेरबंद झाल्याचे समजताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती.
देवळालीत बिबट्याचा मृत्यू
तर मागील बुधवारी देवळाली कॅम्प (Deolali Camp) परिसरतीलच एसडीपी रेंज रोडवरील जवळील डेअरी फार्मजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. 12 जुलै रोजी देवळाली कॅम्प परिसरातील कुमार मंगलम मार्ग स्टेट बँक मार्गसमोर वन्यप्राणी दोन ते तीन महिने वयाचा नर बिबट मृत अवस्थेत आढळून आला. या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात येऊन विभागामार्फत अंत्यसंस्कार करण्यात आले.
संबंधित इतर बातम्या :