(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Hit & Run : नाशिक हिट अँड रन प्रकरणी गुजरातमधून दोघांना बेड्या, मद्य तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस येणार
Nashik Hit & Run : चांदवड परिसरात झालेल्या हिट अँड रन प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून दोन आरोपींना अटक केली आहे. यामुळे मद्य तस्करीचं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक : चांदवड (Chanadwad) परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिट अँड रन प्रकरणी (Nashik Hit and Run) नाशिक ग्रामीण पोलिसांनी (Police) गुजरातमधून (Gujarat) दोन आरोपींना अटक केली असून मोठं रॅकेट यात सक्रिय असण्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकणात दोन चारचाकी वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
अवैद्य मध्य तस्करी प्रकरणी आरोपींच्या गाडीची पाठलाग करत असताना संशयित आरोपींकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला दिलेल्या धडकेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर तीन पोलीस कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले होते. याच प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशीला सुरुवात केली आहे.
अवैधरित्या मद्यतस्करी करणाऱ्या वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग
सिल्वासावरून गुजरातकडे सात ते आठ महागड्या गाड्यांमधून अवैधरित्या मद्यतस्करी केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. याच माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिकच्या द्वारका परिसरात सापळा रचून ही गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालक गाडी न थांबवता पुढे निघून गेला. याच गाडीचा सिनेस्टाईल पाठलाग करत असताना दोन ते तीन ठिकाणी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला.
मोठे मासे हाती लागण्याची शक्यता
चांदवड परिसरात संशयित आरोपीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गाडीला धडक देत पळ काढला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे हाती लागले असून गुजरातमधील मोठे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. सिल्वासा येथून कुणाकडून मद्य घेऊन गुजरातमध्ये कुणाकडे विक्री केली जात होती, या प्रकरणाची चौकशी आता पोलीस करत आहेत. या प्रकरणात अजून आठ ते दहा संशयित आरोपी असतील, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिक हिट अँड रन प्रकरणाची शंभूराज देसाईंकडून दखल
दरम्यान, नाशिकमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाची राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दखल घेतली होती. शंभूराज देसाई यांनी म्हटले होते की, राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या दोन टीमला विदेशी बनावटीची दारू एका वाहनात असल्याचा माहिती मिळाली. त्यानंतर ते या वाहनाचा पाठलाग करताना टीमवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एक कर्मचारी मृत्युमुखी पडला तर दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. आम्ही संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ. पण आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचार्याचा जीव घेणं योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
धक्कादायक! नाशिकमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद