Sunil Bagul Mama Rajwade : सुनील बागुल, मामा राजवाडे आज 'पवित्र' होणार, मोठं शक्तीप्रदर्शन करत कमळ हाती घेणार
Sunil Bagul Mama Rajwade : शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Sunil Bagul Mama Rajwade : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रवेश होताना दिसत आहे. नाशिकमध्ये आज रविवारी (दि. 27) भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यासोबतच काँग्रेसचे काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मामा राजवाडे यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर, नाशिक पोलिसांनी एका मारहाण प्रकरणात सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, हे दोघेही पोलिसांच्या हाताला लागले नव्हते. दुसरीकडे, अटकपूर्व जामिनासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. तोपर्यंत बागुल आणि राजवाडे अज्ञातस्थानी होते, त्यामुळे पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची नोंद 'फरार' अशी करण्यात आली होती. याच कारणामुळे त्यांचा भाजप प्रवेश काही काळासाठी रखडला होता. मात्र, तक्रारदार गजू घोडके यांनी तक्रार मागे घेतल्यानंतर, सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला होता.
मोठं शक्तीप्रदर्शन करत कमळ हाती घेणार
यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांच्यासह काही माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी सुनील बागुल, मामा राजवाडे नाशिकमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे.
काँग्रेससह इतर पक्षाचे नेते आमच्या संपर्कात : सुनील केदार
दरम्यान, भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी काँग्रेससह इतर अनेक पक्षाचे नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय. काँग्रेसचेच नव्हे तर इतर सर्व पक्षाचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यादृष्टीने आमची बोलणी सुरू आहे. रविवारचे प्रवेश झाल्यानंतर अजूनही मोठमोठे प्रवेश येत्या आठ-पंधरा दिवसात होणार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. तर नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने 100 प्लसचा नारा दिला आहे. यावर काँग्रेसने टीकास्त्र डागले आहे. भाजपचा शंभर पारचा दिला जाणारा नारा फोल ठरेल, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. याबाबत सुनील केदार म्हणाले की, काँग्रेसचा हा भ्रमनिरास आहे. काँग्रेस राहिलेलीच कुठे आहे? देशात, राज्यात आणि शहरात देखील काँग्रेसचे अस्तित्वच उरलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून असे वक्तव्य होत आहे. वैफल्यग्रस्त झाल्याने काँग्रेसचे नेते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केलीय.
आणखी वाचा


















