Nashik Lok Sabha 2024 : हेमंत गोडसेंना उमेदवारी, शांतीगिरी महाराजांची नाराजी, श्रीकांत शिंदेंच्या घोषणेवर महायुतीतून आक्षेप
Nashik Lok Sabha 2024 : खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये येऊन हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा, अशी घोषणा केल्यानंतर भाजपमधून नाराजी वाढल्याचे चित्र आहे.
Nashik Lok Sabha 2024 : नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या (Nashik Lok Sabha Constituency) उमेदवारीवरून महायुतीमध्ये (Mahayuti) अस्वस्थता वाढलीय. खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिकमध्ये येऊन हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवा, अशी घोषणा केल्यानंतर भाजपमधून नाराजी वाढल्याचे चित्र आहे. उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार वरिष्ठ नेत्यांना असल्याचे सांगत श्रीकांत शिंदेच्या घोषणेवरच इच्छुक उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.
श्रीकांत शिंदेच्या यांच्या शिवसेना (Shiv Sena) मेळाव्यात हेमंत गोडसेंच्या उमेदवारीच्या घोषणेने एकच जल्लोष झाला. टाळ्यांचा कडकडाट करत शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदेच्या घोषणेचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनीही विकासकामांच्या जोरावर उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे.
श्रीकांत शिंदेंच्या भूमिकेवर आक्षेप
नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेच्या ताब्यात असली तरी भाजपाला जागा मिळावी यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातच भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख केदा आहेर, माजी सभागृह नेते दिनकर पाटील असे अनेक इच्छुक उमेदवारांनी प्रचारही सुरु केला असल्याने श्रीकांत शिंदेच्या घोषणेने त्यांनी उघडउघड नाराजी व्यक्त करत उमेदवारी घोषित करण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असल्याचं सांगत एकतर्फी उमेदवारीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
शांतीगिरी महाराजांना धक्का
एकीकडे भाजपकडून नाराजी व्यक्त होत असताना दुसरीकडे लाखो भक्त परिवाराच्या जोरावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा करणाऱ्या शांतिगिरी महाराज यांनाही धक्का बसला आहे. शांतीगिरी महाराज यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. पुढील दोन तीन दिवसात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र त्या आधीच हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा झाल्यानं आपण ही निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचा दावा शांतिगिरी महाराज यांनी केला आहे.
संजय राऊतांकडून 'त्या' चर्चांना स्पष्ट नकार
कोणी कितीही उमेदवारी घोषित केली तरी आपण निवडणूक लढविणार असा इशाराच शांतीगिरी महाराज यांनी दिला आहे. शांतीगिरी महाराज नाराज असल्यानं महाविकास आघाडीकडून निवडणूक लढतील, अशी चर्चा सुरु असताना शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी मात्र या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे.
कोणाच्या उमेदवारीवर अंतिम मोहर?
शांतिगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यास हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊन महायुतीच्या उमेदवारास त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांकडून शांतिगिरी महाराज यांना थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे तर दुसरीकडे जागावाटपा आधीच उमेदवारीचे नाव घोषित करून शिवसेनेनं भाजपवर कुरघोडी करत मतदारसंघावर दावा अधिकच बळकट केला आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा कणाला मिळते आणि कोणाच्या उमेदवारीवर अंतिम मोहर लागते याकडे लक्ष लागलं असून तोपर्यंत तिकिटासाठीची स्पर्धा, रस्सीखेच आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत.
आणखी वाचा
मोठी बातमी : दिंडोरीची जागा पवार गटाला, नाशिकची ठाकरे गटाला, शरद पवारांची घोषणा