'आमदार देवयानी फरांदेंच्या दबावाखालीच मनपाची कारवाई'; कार्यालय जमीनदोस्त झाल्यानंतर वसंत गितेंचा गंभीर आरोप
Nashik News : जनसंपर्क कार्यालय हटवल्यानंतर माजी आमदार वसंत गिते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. त्यांनी आमदार देवयानी फरांदे यांच्यावर गंभीर आरोप केलाय.
नाशिक : मुंबई नाका परिसरातील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Camp) नेते माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांचे जनसंपर्क कार्यालय काल महापालिकेने (Nashik NMC) जमीनदोस्त केले आहे. महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर आजदेखील मुंबई नाका परिसरात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी असल्याने तणाव कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
वसंत गिते यांचे जनसंपर्क कार्यालय हटवले. मात्र महाराष्ट्र राज्याचा नकाशा असलेला बोर्ड आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बोर्ड कायम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे (Anand Dighe), मनोहर जोशी (Manohar Joshi) आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वसंत गिते यांच्या कार्यालयात येऊन गेले आहेत. जनसंपर्क कार्यालय हटवल्यानंतर माजी आमदार वसंत गिते आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. महापालिकेने काल कारवाई केल्यानंतर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणल्याचा थेट आरोप माजी आमदार वसंत गिते यांनी केला आहे.
देवयानी फरांदेंनी मनपा अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केली असून महापालिकेच्या आयुक्तांनीदेखील त्या संदर्भात बोलतांनी स्पष्ट संकेत दिल्याचा दावा माजी आमदार वसंत गिते यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राजकीय कुरघोड्यांना सुरुवात झाल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
तोडक कारवाईला गिते समर्थकांकडून विरोध
दरम्यान, वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयावर पालिकेकडून जेसीबी चालवण्यात आला त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी वसंत गिते यांच्या कार्यालयात शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे घेऊन कार्यकर्ते उभे होते. या ठिकाणी सुमारे 40 वर्षांपासून संपर्क कार्यालय होतं. हे प्रकरण सध्या नायप्रविष्ट असतानादेखील पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. संपर्क कार्यालयाच्या बाजूला असणारी लहान-मोठी दुकानेही हटवण्यात आली आहेत. या तोडक कारवाईला गिते समर्थकांकडून जोरदार विरोध करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik Crime : काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर, हॉटेल चालकावर कोयत्याने सपासप वार