![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nashik Crime : काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर, हॉटेल चालकावर कोयत्याने सपासप वार
Nashik Crime News : हॉटेल चालकावर दिवसाढवळ्या कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
![Nashik Crime : काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर, हॉटेल चालकावर कोयत्याने सपासप वार Nashik Crime Hotel operator beaten up by waiter in Nashik Road area Maharashtra Marathi News Nashik Crime : काम करायला सांगितल्यानं वेटरचा राग अनावर, हॉटेल चालकावर कोयत्याने सपासप वार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/0dea6f2633427ae063597d931f9e0c6f1719637203803923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Crime News : नाशिकरोड (Nashikroad) परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल चालकावर दिवसाढवळ्या कोयत्याने वार करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. हॉटेलमधील वेटरला (Waiter) काम करण्यास सांगितल्याने त्याच रागातून वेटर आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्याचा आरोप हॉटेल चालकाने केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील मुक्तिधाममागे (Muktidham) असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव (Nitin Sachdev) (रा. देवळाली कॅम्प) हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवत असून, त्यांच्याकडे राजवाडा देवळालीगाव येथे राहणारा डॅनिअल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे. शुक्रवारी दुपारी मालक नितीन यांनी डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितले.
वेटरने केले हॉटेल चालकावर सपासप वार
याचा राग त्याला आल्याने डॅनी याने मालक नितीन सचदेव यांच्याशी वाद करत शिवीगाळ केली आणि थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला. थोड्याच वेळात सात जण हॉटेलमध्ये (Hotel) घुसले आणि थेट नितीन सचदेव हे काउंटरवर बसले असता त्यांना काही समजण्याच्या आत टोळक्याने कोयता रॉडने आणि इतर हत्याराने सपासप वार केले.
हॉटेल चालक गंभीर जखमी
नितीन जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाले आणि त्यांच्या मागे हल्लेखोर पळाले. नितीन या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी नितीन यांना नाशिकरोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात (Hospital) दाखल केले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नितीन यांच्यावर उपचार सुरू केले असून, नितीन सचदेव यांच्या डोक्याला मोठा मार लागला आहे. त्यांना सुमारे 15 टाके पडल्याची माहिती मिळत आहे.
तीन संशयितांना बेड्या
घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. दरम्यान, हल्ल्याप्रकरणी नाशिकरोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून, पोलिसांनी अशा गुंडप्रवृत्तीच्या समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई करून व्यापारीवर्गात असलेली भीती दूर करावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)