मोठी बातमी : जागावाटपाआधीच नाशकात ठाकरे गटाकडून दोन उमेदवार जाहीर, मविआत मिठाचा खडा?
Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये दोन उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यामुळे मविआत मिठाचा खडा पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नाशिक : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे राज्यात वाहू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (01 ऑगस्ट) नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाची (Shiv Sena UBT) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
नुकतेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) दौरा केला होता.यात त्यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून सुनील तटकरे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या नावाची महायुतीच्या जागावाटपाआधीच घोषणा केली. यावरून महायुतीत तणाव झाल्याचे चित्र आहे. यापाठोपाठ महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केल्याने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बडगुजर आणि गिते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय
आज शिवसेना ठाकरे गटाची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक झाली. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुधाकर बडगुजर आणि वसंत गिते यांनी उमेदवारी करण्यासाठी एकमुखाने निर्णय झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
वरिष्ठ नेते काय निर्णय घेणार?
सुधाकर बडगुजर हे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. नाशिकच्या शिवसैनिकांचा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठींना पाठवला जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप बाकी असताना शिवसेना ठाकरे गटाकडून थेट उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेही या जागांवर दावा केल्याने वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिंडोरीत महायुतीत तणाव
दरम्यान, सुनील तटकरे यांनी नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले (Dhanraj Mahale) यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सुनील तटकरेंनी उमेदवारी जाहीर करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत झिरवाळ पिता-पुत्राने शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांचे काम केल्याचा आरोप देखील धनराज महाले यांनी केला आहे.
आणखी वाचा