Rahul Gandhi : नाशकात राहुल गांधींचे सुरक्षारक्षक कार्यकर्त्यांवर संतापले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये धडकली आहे. सारडा सर्कल परिसरात राहुल गांधींचा रोड शो आला असता त्यांचे सुरक्षारक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर संतापले.
Rahul Gandhi नाशिक : राहुल गांधींची (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रा (Bharat Jodo Nyay Yatra) नाशिकमध्ये धडकली आहे. नाशकात राहुल गांधींचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी सारडा सर्कल परिसरात राहुल गांधींचा रोड शो आला असता त्यांचे सुरक्षा रक्षक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर संतापल्याची घटना घडली आहे.
आज दुपारी तीन वाजेच्या दरम्यान राहुल गांधी यांच्या रोड शोला द्वारका चौक येथून सुरुवात झाली. द्वारका चौक येथून यात्रा निघून ती सारडा सर्कल येथे पोहोचली असता राहुल गांधींना जेसीबीवरून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हार घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सुरक्षारक्षकांनी तोडला जेसीबीवरील हार
कार्यकर्ते राहुल गांधींना हार घालतायेत हे पाहून त्यांचे सुरक्षारक्षक संतापले. हार घालण्यास राहुल गांधींच्या सुरक्षारक्षकांनी नकार दिला आणि थेट जेसीबीवरील हार तोडण्यात आला. त्यानंतर गांधींचा ताफा शालिमार परिसराकडे रवाना झाला. राहुल गांधींची शालीमार परिसरात जाहीर सभा पार पडली.
राहुल गांधी त्र्यंबकेश्वरला घेणार महादेवाचे दर्शन
दरम्यान, राहुल गांधी हे शालिमार परिसरातील सभा आटोपून त्र्यंबकेश्वरला रवाना होणार आहेत. ते बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. आज सायंकाळी ते त्र्यंबकला पोहोचणार आहेत.
सरकारकडून गरिबांची कर्ज माफ होत नाही
चांदवडच्या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी, भागिदारी या मोठ्या समस्या आहेत. सरकारकडून श्रीमंतांची कर्ज माफ केली जातात, मात्र गरिबांची नाही. सरकारने 22 उद्योजकांचे 16 लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे. देशातील 70 कोटी लोकांकडे जितकी संपत्ती आहे. तितकी संपत्ती उद्योगपतींकडे आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. उद्योगपतींना माफ केलेले 16 लाख कोटी रुपये जर या योजनेसाठी वापरले असते तर 24 वर्ष ही योजना चालविता आली असती, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकरी जेव्हा कांदा विकण्यासाठी आणतो तेव्हा आयात-निर्यात धोरण बदलून त्याचे उत्पन्न घटविले जाते. आमचे सरकार आल्यानंतर आयात-निर्यात धोरणापासून शेतकऱ्यांचे संरक्षण केले जाईल, असेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
Rahul Gandhi : ...तर आम्ही गरिबांचे कर्ज माफ करणार; राहुल गांधींचे मालेगावातून आश्वासन