Nashik Unseasonal Rain : नाशिकसह जिल्ह्यात रात्रभर अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी दुहेरी संकटात, अनेक भागात लाईट गुल
Nashik Unseasonal Rain : नाशिक शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाची हजेरी लावली. एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
Nashik Unseasonal Rain : नाशिक (Nashik) शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसत आहे. त्यामुळे एकीकडे शेतमालाला भाव नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाच्या हजेरीने शेतकरी (Farmer) दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात झालेला बदल आणि हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस बरसला. काल (5 मार्च) पहाटे देखील अनेक भागात रिमझिम पाऊस बरसला. त्यानंतर काल दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आले. अशातच मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सकाळपर्यंत रिमझिम पाऊस सुरुच होता.
नाशिकसह ग्रामीण भागात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. जिल्ह्यातील येवला पट्ट्यात निफाड, लासलगावसह अन्य काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी हजेरीमुळे कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी बत्ती गुल
तर पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शेतमालाला भाव मिळत नसल्याने आधीच हवालदिल झालेल्या बळीराजासमोर नवं संकट उभे राहिले आहे.
शेतकरी दुहेरी संकटात...
दरम्यान अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे अवकाळी पाऊस कोसळतो आहे. शिवाय शेती पिकावर मोठा परिणाम होत आहे. अगोदरच कांदा, पालेभाज्या, कोबी यासारख्या काही भाज्यांना बाजारात चांगला दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सुलतानी संकटासह अस्मानी संकटामुळे शेतकरी आणखी चिंतेत आले आहेत.
8 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज...
दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण वगळता इतर महाराष्ट्रात 8 मार्चपर्यंत गडगडाटासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. येत्या मंगळवारी 7 मार्चला गारपिटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आणखी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 8 मार्चपर्यंत नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तीन दिवस अवकाळी पाऊस : हवामान विभाग
दरम्यान महाराष्ट्रात तीन दिवस महाराष्ट्रात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 5 ते 8 मार्च दरम्यान काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल.