Nashik Unseasonal Rain And Hail Storm : आयुष्यात अशी गारपीट पाहिली नाही, कुणाचे पत्रे उडाले, कुणाची भिंत पडली, तर कुणाची कौलं फुटली!
Nashik Unseasonal Rain And Hail Storm : नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने कहर केला आहे. अवकाळी पावसाबरोबर गारपीट प्रचंड झाली. अनेक घरांची कौल फुटली, अनेक घरांचे पत्रे उडाली. आंब्याची बाग तर पूर्ण झोडपून काढली आहे.
Nashik Unseasonal Rain And Hail Storm : "असा पाऊस कव्हाच पाणी झाला नाय, पहिली गार पडायची तर हातात घेतल्या घेतल्या इघळून जायाची, पण ही दोन दिस झालंय अजूनही तशीच हाये," अशी प्रतिक्रिया नाशिकच्या पेठ तालुक्यातील अभेटी गावातील गावकऱ्यांनी दिली. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कहर केला आहे.
गेल्या चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. शेतीसह घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील देवळा, चांदवड, सिन्नर, बागलाण, पेठ आदी तालुक्यात प्रचंड प्रमाणात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात पेठ तालुक्यातील अभेटी, आमलोन, बरडापाडा, शेवखंडी आदी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. अभेटी गावात सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी तासभर झालेल्या अवकाळी पावसाने गावातील घरांचे अतोनात नुकसान केले आहे. अवकाळी पावसाबरोबर गारपीट प्रचंड झाली. गारांचे गोळेच्या गोळे घरांवर कोसळत होते. अनेक घरांची कौल फुटली, अनेक घरांचे पत्रे उडाली. आंब्याची बाग तर पूर्ण झोडपून काढली आहे. एकही आंबा शिल्लक राहिलेला नाही.
'कौलांमधून घरात पाणी, कुठे लपावं हे सूचत नव्हतं'
यावेळी गावातील शेतकऱ्यांनी तासभर झालेल्या गारपिटीचे मागील दहा वर्षात अशी गारपीट झाली नसल्याचे सांगितले. यावेळी हरिभाऊ लहारे म्हणाले की "पाऊस सुरु झाला, त्यावेळी घराबाहेर होतो, पुढच्या काही मिनिटांत वादळी वाऱ्यासह मोठं मोठ्या गारा घरावर बरसू लागल्या. एवढ्या गारा पडू लागल्या की कौलांमधून पाणी घरात गळू लागले. त्यामुळे कुठे लपावं हे सूचत नव्हतं. महादू लहारे म्हणाले की, "एवढी गारपीट कधी झाली नव्हती, आमच्या आजोबांनी सुद्धा अशी गारपीट पाहिली नाही, सोमवारी झालेल्या गारांचा पाऊस आजही जशाच्या तशाच आहे. म्हणजे पूर्वी गारा पडत होत्या तर हातात घेतल्या घेतल्या विरघळून जायच्या पण सोमवारी झालेल्या गारांच्या पावसातील गारा आजही गोळेच्या गोळे आहेत." आम्ही तर अशा पावसाने पुरते घाबरुन गेलो होतो, एकच तास पाऊस झाला, खूपच भयानक असल्याचे ते म्हणाले.
तीन दिवसांच्या पावसात 50 हून अधिक घरांचं नुकसान
पेठ तालुक्यातील अभेटी हे अवघे चारशे ते पाचशे लोकवस्तीचे गाव आहे. मात्र मागील तीन दिवसांच्या पावसात जवळपास पन्नासहून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. यात कुणाच्या घराचे पत्रे उडाले, कुणाची कौलं फुटली, आंब्याची बागच झोडपून काढली. कालपासून गावातील मंडळी पावसात नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात व्यस्त आहेत मात्र आज, उद्याही पाऊस झाल्यास आम्ही जाणार कुठे असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पेठ तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी पाहणी करत पंचनामे केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे, मात्र वेळेवर थोडीफार मदत मिळाली तरी बरं होईल, अशी अपेक्षा येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.