नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारी अर्जांची आज छाननी, मविआ अन् महायुतीतला गुंता अजूनही सुटेना, कुणाचे अर्ज बाद होणार?
Nashik Teachers Constituency Election 2024 : . नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे.
Nashik Teachers Constituency Election 2024 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 07) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. या दिवशी 27 उमेदवारांनी 31 नामनिर्देशन पत्र सादर केले. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 40 उमेदवारांनी 53 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे. लोकसभा निवडणुकीप्रमाणे (Lok Sabha Election 2024) नाशिक शिक्षक मतदारसंघातही इच्छुकांची संख्या वाढली. त्यामुळे उमेदवारीवरून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) पेच निर्माण झाल्याचे दिसून आहे. घटक पक्षांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले.
महायुती अन् महाविकास आघाडीत नाट्यमय घडामोडी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असताना काँग्रेसकडून दिलीप पाटील (Dilip Patil) यांनी उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेकडून विद्यमान आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांनी, तर धनराज विसपुते (Dhanraj Vispute) यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे शिक्षक मतदारसंघात नवा द्विस्ट आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे दिसून आले.
मविआत फाटाफूट, महायुतीत समन्वयाचा अभाव
एकीकडे महाविकास आघाडीमध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी देण्यात आली असून, त्यांनी मेळावा घेत उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आव्हान निर्माण झाले. दुसरीकडे महायुतीमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराला स्वतंत्र एबी फॉर्म दिल्याने पक्षाकडून त्यांची उमेदवारी अधिकृत मानली जात आहे.
माघारीच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होणार
महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये उमेदवारीवरून अजूनही स्पर्धा सुरु असल्याचे दिसून येत आहे. आता यातील किती अर्ज बाद होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना माघारीसाठी दबाव टाकल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केला. रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलीस ठाण्यात राडा सुरु होता. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना रात्री आपल्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले. तसेच पोलीस बंदोबस्तात त्यांना घरी सोडण्यात आले . विशेष म्हणजे या प्रकारची कुठलीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. अपक्ष उमेदवार किशोर दराडे अद्यापही घरी परतले नसल्याने ते कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघारीच्या दिवशी माघारीनाट्य रंगणार असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
आणखी वाचा