Nashik Teachers Constituency Election : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच, तिकीट वाटपाचा सावळा गोंधळ सुरूच
Nashik Teachers Constiuency Election 2024 : एकीकडे महाविकास आघाडीकडून संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे महायुतीत तिकीट वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Nashik Teachers Constiuency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) संदीप गुळवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संदीप गुळवे (Sandeep Gulve) हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच (Lok Sabha Election 2024) तिकीट वाटपाचा गोंधळ सुरु असल्याचे चित्र आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दररोज नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे दोघांना एबी फॉर्म मिळाल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीकडून भावसार यांना उमेदवारी जाहीर, दराडे शिवसेनेचे उमेदवार?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून किशोर दराडे उमेदवार असणार, अशी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची माहिती आहे. महायुतीमध्ये या दोन्ही पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महेंद्र भावसार आणि किशोर दराडे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. किशोर दराडे यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे आणि पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी राहणार अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नाशिकच्या जागेवरून महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपचे धनराज विसपुतेही दाखल करणार उमेदवारी अर्ज
तर अजित पवार गट आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु असतानाच भाजपचे पदाधिकारी असलेले धनराज विसपुते हे देखील नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धनराज विसपुते यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर विसपुते यांनी पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली होती. धनराज विसपुते आता नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कोल्हे, विखेही भाजपकडून इच्छुक
दरम्यान, भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी देखील नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपकडून तीन उमेदवार इच्छुक आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून देखील उमेदवार इच्छुक आहे. यावरून लोकसभा निवडणुकीसारखीच नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे दिसून येते.
आणखी वाचा