Nashik Satpir Dargah : नाशिक पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 70 जणांवर गुन्हे दाखल, 25 जणांना अटक, पोलिसांनी ट्रस्टींचा 'तो' दावा फेटाळला
Nashik Satpir Dargah : नाशिक पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी 14 संशयित आरोपीना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर 11 जणांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Nashik Satpir Dargah : उच्च न्यायालयाने काठे गल्ली (Kathe Galli) परिसरातील सातपीर दर्गा (Satpir Dargah) हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, मनपाच्या (Nashik NMC) अतिक्रमण विभागाने पंधरा दिवसांच्या आत सदर काम काढून घ्यावे, असे निर्देश दिले होते. पंधरा दिवसांनंतर पालिकेने मंगळवारी मध्यरात्री दर्गा जमीनदोस्त करण्याच्या कारवाईला सुरुवात करताच अचानक जमावाने दगडफेक केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होऊन यात 21 हून अधिक पोलीस जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत एकूण 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Crime News)
याबाबत अधिक माहिती अशी की, दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बुधवारी पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्याच्या तोडकामाला प्रारंभ केला होता. दोन जेसीबींच्या सहाय्याने दर्ग्याच्या भिंती आणि अन्य बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. अतिक्रमणाचा मलबा आणि साहित्य महापालिकेच्या वाहनांतून बाहेर काढण्यात आले. काठे गल्ली परिसरातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. काठे गल्ली ते भाभानगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.
आणखी 11 जणांना अटक
आता नाशिक दर्गा कारवाई विरोधात दगडफेक प्रकरणी आणखी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 25 वर पोहोचली आहे. तर यात 21 हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेत. या प्रकरणी 14 संशयित आरोपीना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर 11 जणांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 70 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
ट्रस्टींचा 'तो' दावा पोलिसांनी फेटाळला
दरम्यान, या प्रकरणावर सातपीर दर्गाचे ट्रस्टी फईम शेख यांनी म्हटले की, ही कारवाई एकदम अनधिकृत प्रकारे झाली. दोन धर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दगडफेक झाली, त्याचे आम्ही समर्थन करत नाही. ही निंदनीय बाब आहे. नाशिक पोलिसांवर दगडफेक करणारे स्थानिक नागरिक नव्हते, असा दावा त्यांनी केला. तर अटक करण्यात आलेले सर्व नाशिकचेच रहिवासी असून यातील काहींना घटनास्थळावरून अटक करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा करत ट्रस्टी फईम शेख यांचा दावा पोलिसांनी फेटाळला आहे.
दर्गा कारवाई प्रकरणी नवा ट्विस्ट
दरम्यान, नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील दर्गा प्रकरणी आता नवीन ट्विस्ट समोर आलाय. नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत नाशिक महापालिकेने 1 एप्रिलला दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा महापालिका अतिक्रमण काढेल, अशी नोटीस बजावली होती. या नोटीसीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तातडीची सुनावणी केली नाही, असा दावा करत दर्गा ट्रस्टने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी काल सुनावणी पार पडली. याचिकेवर तातडीने सुनावणी का केली नाही? असा सवाल उपस्थित करत मनपाच्या नोटीसीला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने आपला खुलासा सादर करण्याच्या सूचना देखील सर्वोच्च न्यायालयाने केल्या आहेत.
आणखी वाचा
























