नाशकात मुसळधार, दुगारवाडी धबधबावर अडकलेल्या 17 पर्यटकांची सुटका, एक जण अद्याप बेपत्ता
Nashik Rain Update : त्र्यंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या १७ पर्यटकांची मध्यरात्री सुटका करण्यात आली. तर काही पर्यटकांचा अजूनही शोध सुरुच आहे.
Nashik Rain Update : मुसळधार पावसानं नाशिकला (Nashik Rain) अक्षरशः झोडपून काढलं आहे. संध्याकाळनंतर आलेल्या पावसानं गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाली. अशातच नाशिकच्या त्रंबकेश्वरमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेले काही पर्यटक अडकून पडले. शर्थीच्या पर्यत्नांनंतर मध्यरात्री 17 पर्यटकांची सुटका करण्यात यश आलं असून अद्याप एक पर्यटक बेपत्ता आहे.
नाशकातील त्रंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक गर्दी करत असतात. पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य पाहणं म्हणजे, अलभ्यलाभ. पण हा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या काही पर्यटकांना मात्र आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. पावसाचा जोर वाढला असताना देखील धबधब्यावर पिकनिकसाठी जाण्याचा अट्टहास नाशकात काही पर्यटकांच्या अंगलट आला. काल रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं धबधबा पाहण्यासाठी काही पर्यंटकांनी गर्दी केली होती. धबधब्याचं सौंदर्य आणखी जवळून पाहता यावं यासाठी त्यांनी आणखी जवळ जाण्याचं धाडस केलं. आणि या पर्यटकांचं हेच धाडस अंगलट आलं. मुसळधार पाऊस, अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि अंधार यांमुळे पर्यटक अडकले होते. मोबाईलला रेंज नसल्यानं संपर्कही होत नव्हता.
अखेर पर्यटक अडकल्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचली आणि बचावकार्य सुरु झालं. रात्री 8 नंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं. पाऊस, अंधार यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. पण अखेर प्रशासनाना 17 पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. तरिही एका पर्यटकाचा मात्र अद्याप शोध सुरु आहे. पोलीस, जिल्हा प्रशासन, गिर्यारोहक सर्व यंत्रणा वेळीच न पोहचल्यानं पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, अविनाश गरड नावाची व्यक्ती अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध बचाव पथकाकडून सुरू आहे. दरम्यान, पोलीस, जिल्हा प्रशासन, गिर्यारोहक सर्व यंत्रणा वेळीच पोहचल्यानं पर्यटकांची सुखरूप सुटका झाली आहे.
मुसळधार पावसानं नाशिकला झोडपलं
मुसळधार पावसानं नाशिक शहर (Nashik) आणि ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढलं. काल सायंकाळनंतर आलेल्या पावसानं गोदावरीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झाली आणि स्थानिकांची तसंच पर्यटकांचीही चांगलीच तारांबळ उडाली. नदीच्या पातळीत अचानक वाढ झाल्यानं गोदाकाठी उभी असणारी वाहनं नदीच्या प्रवाहात अक्षरशः वाहून जाताना दिसली होती, नदीचं पाणी अचानक वाढल्यानं वाहनचालकांना गाड्यांपर्यंत पोहोचणंही अवघड झालं होतं.. दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसाचा शेतीला मोठा फटका बसला... शेत शिवरात पाणी साचल्यानं उभ्या पिकावर रोगराई पसरण्याची भीती आहे.
दरम्यान, आजपासून 11 ऑगस्टपर्यंत राज्यातल्या अनेक भागात पावसाचं धूमशान असणार आहे. त्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रात अतीवृष्टीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबईतही 8 ते 10 ऑगस्टदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत 100 मिमी पेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही पुढील दोन दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यभर नद्यांची पातळी वाढण्याचा अंदाज असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.