Nashik Politics : नाशिकमधील काँग्रेसचे बडे नेते गळाला लावल्याचा भाजपचा दावा, आता खुद्द काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Nashik Politics : भाजपकडून काँग्रेसचे नाशिकमधील बडे नेते गळाला लागल्याचा दावा केला जात होता. आता यावर काँग्रेस नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.

Nashik Politics : येत्या रविवारी नाशिकमध्ये भाजपचा जम्बो प्रवेश सोहळा पार पडणार आहे. ठाकरे गटानंतर नाशिकमधील काँग्रेसचे (Congress) देखील बडे नेते भाजपच्या (BJP) गळाला लागल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चेमध्ये सर्वाधिक आघाडीवर असलेले नाव म्हणजे काँग्रेसचे राहुल दिवे (Rahul Dive) हे रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा नाशिक भाजपकडून करण्यात आला होता. मात्र, या चर्चांवर स्वतः राहुल दिवे यांनी स्पष्टीकरण देत मी भाजप प्रवेश करणार नाही. पक्षात नाराज नाही आणि आगामी महापालिकेची निवडणूक काँग्रेसकडून लढवणार आहे. आम्ही तशी तयारी देखील करत असल्याची माहिती राहुल दिवे यांनी दिली आहे.
राहुल दिवे म्हणाले की, माझ्या नावाची चर्चा सुरू आहे, असे मला अनेक कार्यकर्त्यांनी सांगितले. परंतु त्या अफवा आहेत. मी काँग्रेस पक्षाचा गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी सध्या प्रदेश कार्यकारिणीत काम करत आहे. मी ज्या पक्षात आहे, त्यात मी आनंदी आहे. पक्षाच्या विचारांशी मी बांधलेलो आहे. त्यामुळे ज्या चर्चा सुरू आहेत त्या अफवा आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
मी काँग्रेसमध्येच राहणार : राहुल दिवे
राहुल दिवे पुढे म्हणाले की, पक्षाने मला विधानसभेची संधी दिली नाही, त्यामुळे मी नाराज आहे असं नाही. नाशिक मध्यची जागा आमच्या वाटेला आली नाही. त्यामुळे पक्षाने मला संधी दिली नाही भाजपचे अनेक कार्यकर्ते जरी बोलत असतील तरी मी त्या गोष्टीचं खंडन करत आहे. मी काँग्रेस पक्षामध्येच राहणार आहे. आगामी निवडणुका काँग्रेस पक्षातच राहूनच लढणार आहे. मला भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी निरोप दिले होते की, तुम्ही पक्षामध्ये सहभागी व्हा. त्यांच्याकडून मला निरोप आले होते. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सुद्धा मला निरोप आले होते. परंतु मी दोन्ही पक्षांना सांगितले की, मी आता तुमच्या पक्षात येण्याच्या मनस्थितीत नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
सुनील केदार यांचा दावा
भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले होते की, रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांचे प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. तसेच राहुल दिवे यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यता आहे. अजून देखील काही शिवसेना ठाकरे गटाचे, काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. ते आमच्या संपर्कात आहेत. लवकरच आपल्याला समजेल, असा दावा त्यांनी केला होता.
आणखी वाचा























