Sunil Bagul Mama Rajwade : पदरी पडले, पवित्र झाले... अखेर सुनील बागुल अन् मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरला; आधी थांबवला होता प्रवेश
Sunil Bagul Mama Rajwade : येत्या रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Sunil Bagul Mama Rajwade : येत्या रविवारी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. मात्र भाजप प्रवेशाच्या आधीच सुनील बागुल आणि मामा राजवाडे हे आज भाजप कार्यालयात दाखल झाले होते. भाजप कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला बागुल आणि राजवाडे यांनी उपस्थिती लावली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना सुनील बागुल पक्ष प्रवेशाचे ठिकाण सांगितले आहे.
सुनील बागुल म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचे विविध मंडळाचे पदाधिकारी, कोर कमिटीचे पदाधिकारी यांची आज एकत्रित बैठक झाली. 27 तारखेला जो प्रवेश होणार आहे, त्या प्रवेशाचं नियोजन कसं असेल? पदाधिकारी कोण-कोण येतील? वरिष्ठ पदाधिकारी कोण असतील? या सगळ्या गोष्टींवर आज विचार विनिमय झाला. प्रत्येक गोष्टीचं नियोजन केले जात आहे. 27 तारखेला एक वाजता हा पक्ष प्रवेश निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
थोरात सभागृहात होणार पक्ष प्रवेश
सुनील बागुल पुढे म्हणाले की, पक्षप्रवेशासाठी मोठे सभागृह मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. गायकवाड सभागृह आम्ही बघितले. एसटी कामगार सेनेने ते पहिलेच बुक केलेले होते. कालिदास सभागृह देखील बुक आहे. त्यामुळे आम्ही थोरात सभागृह निवडले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसचे नेते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार
सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांच्यासह आणखी कोणत्या नेत्यांचा पक्षप्रवेश होणार? याबाबत विचारले असता सुनील बागुल म्हणाले की, माझ्यासोबत अजून इतर पक्षांचे देखील काही लोक येणार आहेत. पण, त्यांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत. ती यादी भारतीय जनता पक्षाकडे आहे. ग्रामीणचे काही पदाधिकारी आहेत. शहरातल्या काही माजी नगरसेवकांचा प्रवेश 27 तारखेलाच होणार आहे. त्यात निश्चितच काँग्रेसचे देखील नेते आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडलेले काही नेते आहेत. इतर पक्षाचे काही माजी आमदार देखील आहेत. अनेक लोक असे आहेत की, ज्यांना भारतीय जनता पक्षात यायचे आहे. त्यांना काम करायचे आहे. त्यामुळे अनेक नेते 27 तारखेला आमच्या सोबत प्रवेश करतील, असा दावा त्यांनी केलाय.
आणखी वाचा


















