Nashik News : नाशिकमध्ये तपासणी मोहिमेत 172 टवाळखोरांविरोधात कारवाईचा बडगा, धारदार शस्त्रासह मद्यसाठा जप्त
Nashik News : अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात परिमंडळ दोनच्या कार्यक्षेत्रात पोलिसांकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली.
Nashik News नाशिक : अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आणि प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2024) पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik Crime New) परिमंडळ दोनच्या कार्यक्षेत्रात तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात तडीपार आणि गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एकूण 123 जणांची तपासणी करण्यात आली होती. यावेळी गुन्हेगारांच्या घरांची तपासणी केली असता त्यात तीन शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच पोलिसांनी (Nashik Police) 172 टवाळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील फरार आरोपींचा शोध, गुन्हेगारांची तपासणी आणि टवाळखोरांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत परिमंडळ दोनमध्ये रात्री सुमारे चार तास तपासणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, डॉ. सचिन बारी यांनी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन ही मोहीम राबविली.
तीन धारदार शस्त्र हस्तगत
या अंतर्गत तडीपार गुन्हे तसेच १२३ गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच १७२ टवाळखोरांविरुध्द कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांच्या घर झडतीत तीन धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आल्याचेदेखील पोलिसांनी म्हटले आहे.
साडेआठ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त
इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायदयान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात साडेआठ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
यापुढेही मोहीम सुरूच राहणार
गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांना अचानकपणे तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम यापुढेही सुरु राहणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या सुट्टया रद्द
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई पायी पदयात्रा करीत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाने सर्व पोलीस घटकांना 'अलर्ट' दिला आहे. २० ते २८ जानेवारी या कालावधीत साप्ताहिक सुटीसह सर्व प्रकारच्या रजा बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. केवळ वैद्यकीय रजा मान्य केल्या जातील. हा नियम पोलिस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना लागू असेल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आणखी वाचा