![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिक हादरलं, बुडणाऱ्या मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी, तिघीही बुडाल्या, दोघींचा मृत्यू
Nashik News : नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तरुणींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी देवा भालेराव या 16 वर्षीय तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
![नाशिक हादरलं, बुडणाऱ्या मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी, तिघीही बुडाल्या, दोघींचा मृत्यू Nashik news Two girls drown in dam near Nandgaon Maharashtra one rescued नाशिक हादरलं, बुडणाऱ्या मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी, तिघीही बुडाल्या, दोघींचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/09/db91f936e02b56134a3adcd999ba97411699510874306291_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News नाशिक : दिवाळी (Diwali) म्हणजे चैतन्याचा सण, सध्या सर्वत्र उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे. मात्र, नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील भालेराव आणि जाधव कुटुंबावर ऐन दिवाळीच्या तोंडावर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही कुटुंबातील अल्पवयीन युवतींचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.
नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या या तरुणींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी देवा भालेराव या 16 वर्षीय तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कपडे धुताना दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा अशोक जाधव, खुशी देवा भालेराव आणि कावेरी भालेराव या तिन्ही मैत्रिणी नेहमी प्रमाणेच कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. चिंचविहीर गावाजवळ असलेल्या के. टी. बंधाऱ्यावर त्या कपडे धुवत होत्या. कपडे धुवत असताना अघटित घडले. पूजा जाधव आणि खुशी भालेराव या दोघींचा अचानक पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच कावेरीनेही तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिला त्या दोघींना वाचवण्यात अपयश आले.
गावकऱ्यांची घटनास्थळी धाव
दरम्यान तिने आरडाआरोड करण्यास सुरूवात केली. ही सर्व बाब ग्रामस्थांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तिन्ही तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या तिन्ही तरुणींना बाहेर काढले गेले त्यावेळी त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पूजा आणि खुशी यांना मृत घोषित केलं. तर कावेरीवर मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नांदगावात पाण्याचं दुर्भिक्ष्य
दरम्यान, ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे जाधव आणि भालेराव कुटुंबासह चिंचविहीर गावावर शोककळा परसली. तसेच पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईची मोठी समस्या आहे. यंदा तर तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे विहिरीही आटण्यास सुरुवात झाली आहे. पाण्याचं दुर्भिक्ष्य असल्याने ग्रामीण भागातील महिलांना मोठी पायपीट करावी लागते. तसेच कपडे धुणे आणि इतर कामांसाठी बंधारे, तलाव यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, मागील काही वर्षात साठवण क्षमता वाढावी या अनुषंगाने तलाव आणि बंधाऱ्यांची खोली वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ते धोकादायक बनले आहेत.
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)