नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर, जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष-जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली
Nashik Politics : नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
नाशिक : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा काल नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. काल नाशिक शहरात शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोरच विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) इच्छुक उमेदवारांच्या यादीवरून नाशिकचे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये चांगलीच जुंपली. यामुळे नाशिकमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
शेलारांचा आव्हाडांवर निशाणा
जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी जिल्ह्यातील इच्छूकांची यादी जाहीर केली होती. यानंतर शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासमोरच शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या संदर्भात खळबळजनक वक्तव्य केलं. आव्हाड यांना पक्षाच अध्यक्ष केलं तर ते महाराष्ट्र मुकवतील, असे वक्तव्य गजानन शेलार यांनी केले.
कोंडाजी आव्हाडांचा पलटवार
तर जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांनी गजानन शेलार यांच्या टीकेला जोरदार पलटवार केला आहे. मारणाऱ्याचा हात धरू शकतो, बोलणाऱ्याचे तोंड नाही. त्यांना माझ्याबद्दल असे का म्हणायचे होते मला अजूनही समजले नाही. असे जाहीर वक्तव्य करणे टाळायला पाहिजे. एखाद्याच्या स्वभावाला औषध नसते. अशा स्वरूपाच्या विधानामुळे पक्षवाढीवर परिणाम होतो. आम्ही पक्ष वाढीसाठी संपूर्ण जिल्ह्यात रक्ताचे पाणी केले आहे. संपूर्ण जिल्हा जाणतो आम्ही काय केलं. ज्यांनी अर्ज आणि डीडी दिले होते ते जयंत पाटील आणि पवार साहेब यांच्याकडे दिले आहे. त्यांनी शहराची यादी दिली की नाही हे माहिती नाही, असा पलटवार कोंडाजी आव्हाड यांनी केला.
मेहबुब शेख यांच्याकडून शेलारांच्या विधानाची सारवासारव
दरम्यान, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी गजानन शेलार यांच्या विधानाची सारवासारव केल्याचे दिसून आले. गजानन शेलार स्पष्ट बोलतात, त्यांच्या पोटात जे तेच ओठावर असतं. गजानन शेलार आमदार व्हावेत, अशी आमची इच्छा आहे, असे त्यांनी म्हटले. तर शरद पवार यांच्या सोबत नाशिक जिल्हा अडचणीच्या वेळी उभा राहत आहे. अजित पवार आज कुठे आहेत? ईडीने सील केलेले प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? आज सगळे भ्रष्टाचारी कुठे आहेत तर ते भाजपमध्ये आहेत. गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना टाकतात. महागाई, बेरीजगारीवर बोलत नाहीत ते मुस्लिम समाजावर बोलतात. धर्मात तेढ निर्माण करत आहेत. आपल्याला नाशिकमधील जास्तीत जास्त जागा निवडून यायच्या आहेत.
आणखी वाचा