(Source: Poll of Polls)
Nashik Ramkunda: नाशिकच्या रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यावरून वाद, जलस्रोतांना नवसंजीवनी, पुरोहित संघाचं म्हणणं काय?
Nashik Ramkunda : रामकुंडातील सिमेंट काँक्रीटीकरण काढून टाकण्यासंदर्भात स्मार्ट सिटीने दोन्ही बाजूंची बैठक घेतल्यानंतरही तोडगा निघालेला नाही.
Nashik Ramkunda : गोदावरी नदीतील (Godavari River) सिमेंट काँक्रीटीकरण काढून टाकण्यात यावे, असा अहवाल नाशिक स्मार्ट सिटीने (Nashik Smart City) गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिल्यानंतर ही पुरोहित संघ, जीव रक्षक दलाने हरकत घेत काँक्रीटीकरण न काढण्याची भूमिका घेतली. यानंतर स्मार्ट सिटीने दोन्ही बाजूंची बैठक घेतल्यानंतरही तोडगा निघालेला नाही. मात्र त्रिसदस्य समितीने दिलेल्या निर्णयानुसार, नदीपात्रातील रामकुंड कॉक्रिटीकरण काढण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्वाळा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून (Nashik) नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदावरी नदीचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. गोदावरी नदी पात्रातील अनेक ठिकाणचे तळ काँक्रीट काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे अनेक जल स्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे. तर दुसरीकडे रामकुंडातील (Ramkunda) तळ काँक्रीट काढण्यात यावे यासाठी देवांग जानी (Devang Jani) यांनी याचिका दाखल केली होती. स्मार्ट सिटीने तरी सदस्यीय समिती गठीत करत अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार या समितीने रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यात यावे असा अहवाल दिला. मात्र स्थानिक पुरोहित संघ आणि जीव रक्षक दल यांनी या कामास विरोध दर्शविला आहे. त्यावरून दोन दिवसांपासून बैठका घेऊनही वाद मिटत नसल्याचे चित्र आहे.
गोदावरी नदीपात्र रामकुंडातील काँक्रिटीकरण हटविण्याच्या कामाला पुरोहित संघ, जीवरक्षक दल आदींनी हरकत घेतल्याने ब्रेक लागलेला असतांना त्यावर तोडगा काढण्यासाठी स्मार्ट सिटीने दोन्ही बाजूची बैठक घेतली असता, त्यात पुन्हा खडाजंगी झाली. मात्र त्रिसदस्य समितीने दिलेल्या निर्णयानुसार नदीपात्रातील रामकुंड कॉंक्रिटीकरण काढण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्वाळा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिला.
दरम्यान, नदीपात्रातील कॉंक्रिटीकरण काढण्यासाठी बोर्डाने समिती स्थापन केली असून जिल्हाधिकारी आयुक्त यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या निर्णयानुसार नदीपात्रातील पाण्याचे आवर्तन बघून तसेच रामकुंडावर काही धार्मिक कार्यक्रम आहे की नाही याची माहिती घेत सदर कामाचे नियोजन करून गरज पडल्यास पोलिस करावी. बंदोबस्तात सदर कुंडातील काँक्रिटीकरण काढण्याचे काम हाती घेणार असल्याचे स्मार्ट सिटीचे मोरे यांनी सांगितले.
सिमेंट काँक्रीट काढणे गरजेचे...
तर पार्श्वभूमीवर याचिकाकर्ते देवांग जानी म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही. हे काँक्रीट काढायला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. कोर्टाच्या स्टे ऑर्डर शिवाय काम थांबू शकत नाही. त्रिसदस्यीय समितीने रामकुंडातील तळ सिमेंट काँक्रीटीकरण काढण्याचा निर्णय घेतला असून त्यावर त्वरित कार्यवाही करावी. तर रामकुंडातील तळ सिमेंट कॉक्रिटीकरण काढू नये, पुरोहित संघ, व्यापारी, जीवरक्षक दल आणि परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. सांडव्यावरचे काँक्रीट काढल्याने काहीजण वाहून गेले. काँक्रीट काढण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करणार असल्याची भूमिका पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी घेतली आहे.