(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येला नाशकात दुर्दैवी घटना; तारांवर अडकलेली पतंग काढायला गेलेल्या मुलाचा विजेच्या झटक्याने मृत्यू
Nashik News : मकर संक्रातीच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये दुःखद घटना घडली आहे. विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या 15 वर्षीय मुलाचा विजेच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाला आहे.
Nashik News नाशिक : मकर संक्रात (Makar Sankranti) सणाच्या पूर्वसंध्येलाच नाशिकमध्ये एक दुःखद घटना समोर आली आहे. विजेच्या तारांवरील अडकलेली पतंग काढायला गेलेल्या एका 15 वर्षीय मुलाचा विजेच्या जोरदार झटक्याने मृत्यू झाला आहे. भाग्येश विजय वाघ (Bhagyesh Wagh) असे मयत मुलाचे नाव असून तो दहावी इयत्तेत शिक्षण घेत होता.
स्टीलच्या रॉडचा आधार घेतला अन् बसला विजेचा झटका
रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साई राम रो हाऊस जवळ काही मुलं खेळत होती. याचवेळी विजेच्या तारांवर अडकलेली पतंग काढण्यासाठी भाग्येशने एका स्टीलच्या रॉडचा आधार घेताच त्याला विजेचा जोरदार झटका बसला.
त्याला परिसरातील नागरिकांनी तात्काळ उपचारासाठी त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.त्यानंतर वडिलांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. भाग्येश हा इयत्ता दहावीत शिकत होता, त्याच्या पश्चात आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिक पोलिसांकडून मनाई आदेश जारी
पतंगाच्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानवी जिवीतास धोका निर्माण होतो. पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, वाहनस्वार जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना याआधी घडल्या आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तांरामध्ये अडकून काही ठिकाणी आगी देखील लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांकडून दि. 23 जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा (Nylon Manja) विक्री व वापरावर मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
...तर होणार कारवाई
नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दि.२३ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा विक्री व वापरावर मनाई केली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार आहे. तसेच गुन्हा दाखल केल्यानंतरही मांजाचा वापर व विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितास तडीपार, हद्दपार व इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या