Nashik Leopard News : अखेर बिबट्या मादी अन् बछड्यांची झाली भेट, घटना कॅमेऱ्यात कैद
Nashik News : सिन्नर तालुक्यातील माळेगाव परिसरात बिबट्या मादी आणि पिल्लांची ताटातूट झाली होती. त्यानंतर वनविभागाने या माय-लेकाची भेट घडवून आणली. या भेटीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
Nashik Leopard News नाशिक : शहरासह जिल्ह्यात बिबट्याचे (leopard) दर्शन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. सिन्नर (Sinnar) तालुक्यातील माळेगाव (Malegaon) परिसरात बिबट्या मादी आणि पिल्लांची ताटातूट झाली होती. त्यानंतर वनविभागाने (Forest Department) या माय-लेकाची भेट घडवून आणली. या भेटीचे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगावमध्ये राहणाऱ्या नामदेव रामचंद्र काकड यांच्या शेतात बुधवारी सकाळी ऊसतोडणीचे काम चालू असतानाच बिबट्याचे तीन पिल्ले आढळून आले होते. याच परिसरात बिबट्याची (Leopard) मादी देखील असल्याच्या शक्यतेवरून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
टोपली खाली ठेवले पिल्लांना
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पिल्लांना आईची भेट घडवणे गरजेचे असल्याने वनविभागाच्या वतीने त्याच ठिकाणी टोपली खाली पिल्लांना ठेवण्यात आले होते. त्यानंतर नाईट व्हिजन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते.
अखेर बिबट्या मादी अन् पिल्लांची झाली भेट
सायंकाळच्या सुमारास मादी तीन पिलांना सुखरूप घेऊन जातानाची दृश्य कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. वनविभागाने माय लेकांची ताटातूट दूर केली आहे. त्यामुळे परिसरातील स्थानिक शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
देवळाली कॅम्पला बिबट्याचा मुक्तसंचार
दरम्यान, नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून, स्टेशनवाडी लगतच्या नाल्याजवळ तीन बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देवळाली कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडे असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा आहे. सध्या नाणेगाव व विजयनगर भागातील ऊसतोड सुरू असल्याने बिबट्याने आपला मोर्चा लगतच्या स्टेशन वाडी परिसरात हलवल्याचे दिसून येते. येथील नाल्यावर तीन बिबटे एकत्रित फिरत असल्याचे नागरिकांना निदर्शनास आले.
पिंजरा लावण्याची मागणी
काहींनी त्यांच्या छबी मोबाइलमध्ये टिपल्या आहेत. या भागातील पाळीव प्राणी, कुत्रे, डुक्कर, कोंबड्या अशी जनावरे खाद्य मिळत असल्याने बिबट्यांचा मुक्काम सध्या या भागात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी या परिसरातील अनिल जगताप, प्रवीण पवार, अक्षय पवार, सुयोग तपासे आदी नागरिकांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik MD Drugs : मोठी बातमी! नाशिकमध्ये पुन्हा सापडले एमडी ड्रग्ज; दोघांना अटक