Nashik Ganeshotsav : नाशिककरांनी हा देखावा पाहिला नाही तर काय पाहिलं? शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा 12 मिनिटांचा जिवंत देखावा
Nashik Ganeshotsav : शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा 12 मिनिटांचा शाळा सुधारल्या पण शिक्षण (Educational System) बिघडलं' या विषयावर आधारित जिवंत देखावा साकारला आहे.
![Nashik Ganeshotsav : नाशिककरांनी हा देखावा पाहिला नाही तर काय पाहिलं? शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा 12 मिनिटांचा जिवंत देखावा Nashik latest News Ganesh Chaturthi 12-minute lively scene commenting on education system in Nashik maharashtra News Nashik Ganeshotsav : नाशिककरांनी हा देखावा पाहिला नाही तर काय पाहिलं? शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा 12 मिनिटांचा जिवंत देखावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/26/e4c7eb93ea9c3eab9123c6ca3a314d8c1695733700435738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : आजचे शिक्षण (Education) म्हटलं की खूपच महागडे झाल्याचे पालक सांगतात. शाळेच्या ऍडमिशनपासून ते क्लासच्या फीपर्यंत सर्वच अवघड होऊन बसला आहे. यामुळे पालकांच्या नाकीनऊ येऊ लागले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील वेलकम सहकार्य मित्रमंडळाने शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा 12 मिनिटांचा शाळा सुधारल्या पण शिक्षण (Educational System) बिघडलं' या विषयावर आधारित जिवंत देखावा साकारला आहे. सद्यस्थितीत शिक्षणाचे बाजारीकरण कसे झाले आहे, याबाबत शिक्षण व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा हा देखावा नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
नाशिकमध्ये (Nashik) गणेशउत्सवाची लगबग सुरु आहे. सार्वजनिक मंडळाच्या गणेश देखाव्यांना (Ganesh Decoration) नाशिककरांची गर्दी होऊ लागलेली आहे. कुठे केदारनाथ मंदिर, कुठे राजकीय भाष्य, तर कुठे चांद्रयानचा देखावा, मात्र या सगळ्यात गंभीर विषयाला हात घालून समाजाला विशेषतः शिक्षण व्यवस्थेला जाग करणारा हा देखावा पाहण्यासारखा आहे. घरातील लहान मुलांना आजकाल शाळेत टाकायचं म्हटलं तर पालकांना किती संघर्ष सहन करावा लागतो, याचा उहापोह या देखाव्यातून 'करण्यात आला आहे. 'शाळा सुधारल्या पण शिक्षण बिघडले' या विषयावर आधारित नाशिकच्या सोमवार पेठेतील वेलकम सहकार्य मित्र मंडळाने (Welcome Sahkary Mitra Mandal) सादर केलेला जिवंत देखावा यंदा नाशिककरांचं मुख्य आकर्षण ठरतो आहे.
सध्याच्या काळात खासगी इंग्रजी माध्यमांच्या (English School) शाळांनी अक्षरशः शिक्षणाचा बाजार मांडला असून यामुळे पालकवर्गही मुलांच्या शिक्षणावरून चिंतेत आहेत आणि यावरच हा देखावा भाष्य करतो. 12 मिनिटांच्या या देखाव्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळेत एक वर्ग भरतो, सुटा बुटातील गुरुजी वर्गात येताच दुसऱ्या दुकानातून युनिफॉर्म घेतलेल्या तसेच शाळेची फी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांना ते वर्गाच्या बाहेर काढतात, त्यानंतर वर्ग सुरू होतो आणि इंग्लिश शाळेत (English School) मराठीत बोलला म्हणून एका विद्यार्थाला शिक्षा सुनावली जाऊन 'तू सरकारी टुकार मराठी शाळेत जा' असा सल्ला त्याला दिला जातो. दुसऱ्या दिवशी शिक्षणमंत्री शाळेला भेट देण्यासाठी आले असता आदल्या दिवशी शिक्षा सुनावलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येतात आणि मंत्री महोदयांसमोरच शिक्षकांना जाब विचारत एकेकाळी सर्वपल्ली राधाकृष्णन सारखे गुरू होते आणि आता तुम्ही शिक्षणाचा बाजार मांडला असून यामुळे पालक वर्ग कसा त्रस्त झाला आहे, हे सांगत आपल्या व्यथा मांडतात.
नाशिककरांनी हा देखावा पाहिलाच पाहिजे....
'नवे नवे पेन ज्याची निळी निळी शाई, नवा बॉक्स, नवा पेन अभ्यासाची वही, नव्या नव्या दप्तरात जेवणाचा डबा, शाळा माझे गाव माझे आई आणि बाबा घड्याळाची बेल झाली, उठा आता पळा रिक्षावाले काका आले, सुरु झाली शाळा' अशा कवितेने या जिवंत देखाव्याला सुरवात होते. त्यानंतर वर्गातील फी न भरलेल्या, शाळेचा ड्रेसकोड शाळेतून न घेता इतर दुकानांमधून घेतल्याने विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या, तर पालकांना इथल्या शाळा व्यवस्थापनाच्या रोषाला सामोरे जावे लागते. तरीदेखील एखाद्या वेळी फी भरली नाहीच तर विद्यार्थ्याला शाळेतून बाहेर काढले जाते. त्याचबरोबर महागड्या शाळांकडून सरकारे शाळांचा उदोउदो केला जातो. तसेच पालकांची हेटाळणी केली जाते. देखाव्याच्या शेवटी 'मी माझ्या बायकोचे दागिने विकून तुमची फी भरायला आलो आहे, पण माझ्या मुलाला शाळेत बसू द्या' हा क्षण देखावा बघण्यासाठी आलेल्या प्रत्येक पालकाच्या काळजाला भिडतो. एकूणच सध्याची शिक्षण व्यवस्था पालकांची कशी पिळवणूक केली जाते, असे चित्रण या जिवंत देखाव्यातून मांडले आहे.
देखाव्याची संकल्पना कशी सुचली?
वेलकम सहकार्य मित्रमंडळाचे अध्यक्ष गणेश मोरे यांनी या देखाव्याची संकल्पना लिहिली आहे. मोरे हे काही महिन्यापूर्वी मित्रांसोबत फिरायला गेले होते. यावेळी मित्राला अनेकदा फोन येत होते. त्यावेळी मित्राच्या बोलण्यातून शाळा व्यवस्थापनाकडून फी जमा करण्यासाठी तगादा लावला जात असल्याचे समोर आले. आणि याच माध्यमातून हा जिवंत देखावा समोर आला. तब्बल महिनाभरापासून यावर काम सुरु होते. गणेश मोरे यांनी ही स्क्रिप्ट लिहली असून गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)