Dada Bhuse : सुषमा अंधारेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता, शंभूराज देसाईंपाठोपाठ दादा भुसेंनीही नोटीस धाडली!
Dada Bhuse Vs Sushma Andhare : आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना देखील मंत्री दादा भुसे यांच्याकडून नोटीस देण्यात आली आहे.
नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना देखील मंत्री दादा भुसे यांच्याकडून नोटीस देण्यात आली आहे. विविध वर्तमानपत्राचा दाखला देत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणी मंत्री दादा भुसे यांची बदनामी केल्यासंदर्भात वकीलांमार्फत अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकच्या ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेणे सुषमा अंधारे यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपासून नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यात सुरवातीला सुषमा अंधारे यांनी दादा भुसेंवर अंगुलीनिर्देश केला होता. त्यावेळी दादा भुसे यांनी देखील कोणत्याही चौकशीला समोर जाण्याची तयारी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पुन्हा संजय राऊत यांनी दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवत नाशिक च्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यामुळे दादा भुसे यांनी हे आरोप धुडकावून लावत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते. तर दुसऱ्या एका प्रकरणात संजय राऊत यांनी बदनामी केली म्हणून दादा भुसे यांनी मालेगाव कोर्टात खटला दाखल केला होता. त्या संदर्भात कोर्टाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता ड्रग्ज प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेतल्यामुळे सुषमा अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत दादा भुसेंसह शंभूराज देसाई यांचा नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणात हात असल्याचे सांगितले होते. त्यांच्या चौकशीसह नार्को टेस्ट करा असेही सांगण्यात आले होते, त्यानंतर दादा भुसे यांनी प्रत्युत्तर देताना आपला कोणताही संबंध नाही. काय चौकशी करायची ती करा, आमची तयारी असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर आता मात्र मंत्री दादा भुसे यांच्याकडून सुषमा अंधारे यांना नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ड्रग्स प्रकरणात दादा भुसे यांचे नाव घेणे सुषमा अंधारे यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागा, असा नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे.
Nashik Latest News : काय म्हटलं आहे नोटिसीत?
नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मंत्री भुसे यांच्याकडे सुषमा अंधारे यांनी अंगुलीनिर्देश केला होता. त्यामुळे आता दादा भुसे यांनी विविध वर्तमानपत्राचा दाखला देत भुसे यांची बदनामी केल्यासंदर्भात वकीलांमार्फत अंधारे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात बदनामी केल्याप्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागा, असा नोटीसीत उल्लेख करण्यात आला आहे. तसेच नोटीसीला उत्तर न दिल्यास मानहानीचा दावा दाखल होणार असा इशारा देखील देण्यात आला आहे. खा.संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता सुषमा अंधारे यांच्यावर मंत्री दादा भुसे मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे दिसते आहे.
इतर महत्वाची बातमी :