त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण, मंत्रालयातून दखल घेत गंभीर गुन्हा दाखल; तिघांना अटक
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही गुंडाकडून पार्किंगच्या वुसलीवरुन झालेल्या बाचाबाचीतून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

नाशिक : देवस्थान आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी होणाऱ्या बेकायदा, अनियमित पार्किंग वसुलीचा मुद्दा चांगलाच चर्चेत असतो. विशेष म्हणजे स्थानिक वसुलीदार अगदी खंडणी मागितल्यासारखी दमदाटी करुन भाविकांकडून पार्किंगची मनमानी वुसली करतात. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज शनिवारी धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तीन ते चार पत्रकार (Journalist) गंभीर जखमी झाले असून, सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेत आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, अखेर पोलिसांकडून (Police) आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसेच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील कमानी परिसरात पत्रकारांना काही गुंडाकडून पार्किंगच्या वुसलीवरुन झालेल्या बाचाबाचीतून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. येथे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती घेणाऱ्या काही व्यक्तींनी, पत्रकारांवर अचानक हल्ला केला. पत्रकार वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वरला गेले असता संबंधित गुंडांकडून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यामध्ये, तीन ते चार पत्रकार जखमी झाले असून त्यांना तात्काळ त्र्यंबकेश्वरच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर आता पत्रकारांना मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न, तसेच दंगल माजवल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटकही करण्यात आली आहे. प्रशांत राजू सोनवणे, शिवराज धनराज आहेर आणि ऋषिकेश योगेश गांगुर्डे यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीत, जीवे मारण्याच्या हेतूने लाथा बुक्क्या, दगड, छत्रीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पत्रकारांसाठी मैदानात उतरणार- बच्चू कडू
नाशिकमध्ये पत्रकारांवर गुंडांकडून झालेल्या हल्ल्याचा बच्चू कडू यांनीही निषेध केला आहे. पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत असल्याने बच्चू कडू आता पत्रकारांसाठी मैदानात उतरणार आहेत. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकार काम करत असतात, त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत. पत्रकारांनी धास्ती घेऊ नये, पत्रकार म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम पत्रकार करतात असे म्हणत बच्चू कडूंनी पत्रकारांच्या कार्याला सलाम असल्याचंही म्हटलं.
























