Dada Bhuse : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसेंची गाडी अडवली; नेमकं घडलं तरी काय?
Dada Bhuse : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकचा दौरा आटोपून त्यांचा ताफा ओझर विमानतळावर जात असताना विमानतळाच्या प्रवेशद्वारावर पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला पोलिसांनी अडवले.
![Dada Bhuse : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसेंची गाडी अडवली; नेमकं घडलं तरी काय? Nashik Guardian Minister Dada Bhuse s car in CM Eknath Shinde s convoy stopped by police Marathi News Dada Bhuse : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसेंची गाडी अडवली; नेमकं घडलं तरी काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/f6bcaa99ec2ceea834379706ebb26c591719061745169923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या (Nashik Teachers Constituency Election 2024) पार्श्वभूमीवर आज नाशिक दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दौरा आटोपून त्यांचा ताफा ओझर विमानतळावर (Ozar Airport) जात असताना विमानतळाच्या गेटवर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या वाहनाला पोलिसांनी अडवले.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. नाशिकच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण नाशिकमध्ये महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. एकीकडे महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी बैठकांचे सत्रही सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता किशोर दराडे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये बैठका पार पडल्या.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या बैठका आटोपून मुख्यमंत्री एकनाथ हे ओझर विमानतळावर जाण्यासाठी निघाले. यावेळी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला पोलिसांनी अडवले. पालकमंत्री दादा भुसे हे मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसलेले असताना पालकमंत्रीचे स्वीय सहायक आणि इतर स्टाफ दादा भुसेंच्या वाहनात होते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांची गाडी अडवली.
आम्ही काय आतंकवादी आहोत का?
यानंतर गाडीला विमानतळाच्या गेटमध्ये प्रवेश देत नसल्याने दादा भुसे यांचे स्वीय सहायक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आम्ही काय आतंकवादी आहोत का? असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारण्यात आला. काही वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी गाडी सोडली. मुख्यमंत्री शिर्डीला रवाना झाल्यानंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. गाडीत स्टाफ असताना गाडीला का अडवले? असे खडेबोल दादा भुसेंनी पोलिसांना सुनावले.
मुख्यमंत्र्यांचे लोणी येथे जोरदार स्वागत
दरम्यान, नाशिकमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोणी येथे दाखल झाले आहेत. यावेळी अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत केले. नाशिक शिक्षक मतदारसंघ पदाधिकारी आणि संस्थाचालक यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रवरा अभिमत विद्यापीठात संवाद साधणार आहेत. या बैठकीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उमेदवार किशोर दराडे, राजेंद्र विखे पाटील उपस्थित आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)