(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : सोबत कामाला नेलं, त्यांनीच काटा काढला; चांदवड तालुक्यात मजुराला संपवलं
Nashik Crime : चांदवड तालुक्यात किरकोळ वादातून मजुराला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.
Nashik Crime : नाशिकसह (Nashik News) जिल्ह्यात गुन्हेगारीच्या सातत्याने घडत आहेत. अशा किरकोळ वादातून जीवे मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाण वाडी परिसरात अशीच घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून झालेल्या घटनेत मजुराला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे.
चांदवड (Chandwad Taluka) तालुक्यातील मजुरीसाठी गेलेल्या मजुरांमध्ये वाद झाला. हा वाद मनात ठेवून त्या भांडणाची कुरापत काढून मजुरी करणाऱ्या नातेवाईकांमध्ये हाणामारी होऊन सोबतीला असलेल्या मजुराच्या डोक्यात दगडाने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी गावाच्या शिवारात ही घटना घडली आहे.
चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी येथील पप्पू पठाण यांच्या मळ्यात सुरगाणा (Surgana) तालुक्यातील आमदा, हातरुंडी येथील हिरामण जाधव आणि पत्नी मीना जाधव ही शेतमजूरीच्या कामासाठी काही दिवसांपासून वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक जालिंदर जाधव आणि देविदास पवार हे देखील शेतमजुरीच्या कामानिमित्त मळ्यात वास्तव्यास आहेत. हिरामण जाधवने जालिंदर आणि देविदास यांना शिव्या दिल्याने त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. यावेळी किरकोळवादाचे रूपांतर हाणामारी झाल्याने जालिंदर आणि देविदास यांनी हिरामण जाधव यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने रक्ताचा रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले.
यामुळे घाबरून जालिंदर आणि देविदास यांनी हिरामण जाधव यांचा मृतदेह भास्कर शंकर तिडके यांच्या द्राक्ष बागेत नेऊन टाकत तिथून पळ काढला होता. या घटनेची माहिती वडनेर भैरवचे (Vadner Bhairav Police Station) सहाय्यक पोलीस अधिकारी मयूर भामरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर पथकाला पाचरण करत संबंधित जालिंदर आणि देविदास यांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी वडनेरभैरव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांना चांदवड न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश महान यांनी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली
एकीकडे पोलीस प्रशासन म्हटलं की, गुन्हेगारांना आजही घाम फुटतो, असं म्हटलं जात. मात्र दुसरीकडे गुन्हेगारीचं एवढी वाढली की पोलिसांना घाम फुटण्याची वेळ आली आहे. सातत्याने होणाऱ्या घटनांनी शहर तसेच जिल्हा हादरत आहे. कौटुंबिक वाद, नवरा बायकोचे भांडण, पूर्ववैमन्यस्य आदी कारणांतून खुनाच्या घटना घडत आहेत. अशातच जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील धोंड गव्हाणवाडी येथे दगडाने वार करून मजुराची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.