सातबाऱ्यावर नाव का नाही? विचारलं अन् चक्क सुरगाणा नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली
Nashik News: सातबाऱ्यावर नाव का नाही? असं विचारत चक्क सुरगाणा नायब तहसीलदारांच्या कानशिलात लगावली. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik News: जमिनीचा सातबारा (7/12 Utara) हा अत्यंत महत्वाचा विषय असून यामध्ये अनेकदा माहितीचा अभाव असल्यानं अनुचित प्रकार घडल्याचं निदर्शनास आलं आहे. नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) सुरगाणा तहसील कार्यालयात (Surgana Tehsil Office) संशयितानं चक्क नायब तहसीलदाराच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिकच्या (Nashik Latest News) सुरगाणा तहसील कार्यालयात हा प्रकार घडल्यानं खबबळ उडाली. जमीनीच्या सातबाऱ्यावर इतर जणांची नावं कशी आली? त्यात माझं नाव का नाही? असा जाब विचारत एक जणानं येथील नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) यांची कॉलर पकडून गालात चापट मारल्यानं या व्यक्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सुरगाणा तालुक्यातील हट्टी येथील ही घटना असून भारत गुलाब पवार असं या संशयितांचं नाव आहे. पवार हे अन्य दोन जणांसोबत सुरगाणा तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास गेले होते. या दरम्यान ही घटना घडली. नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे, दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास नायब तहसीलदार मोरे हे निवडणूक शाखेत बसून शासकीय कामकाज करीत होते.
यावेळी पवार यानं सोबत हट्टी गाव शिवारातील गट नंबर 50 चा उतारा मोरे यांना दाखविला. सदर उताऱ्यावर माझं नाव का कमी केलं? तसेच उताऱ्यात इतर लोकांची नावं कशी आली? त्यावर उताऱ्यात तुझ्या वडिलांचं नाव असून त्यांच्या पश्चात तुमचं नाव लागेल. त्यासाठी लेखी अर्ज करा असं सांगण्यात आलं आहे. त्यावेळी पवार यास राग येऊन त्यानं मोरे यांना शिविगाळ करत कॉलर पकडून गालात चापट मारल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
हा प्रकार घडल्यानंतर भारत पवार आणि अन्य दोघे तहसील आवारातील तिरंगा ध्वजाखाली काही काळ ठाण मांडून बसले होते. त्यानंतर ते दुचाकीवरून निघून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करीत आहेत.