(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik MD Drugs : 'त्या' ड्रग्ज पुरवठादारास 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी; 'इतक्या' लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
Nashik News : नाशिक पोलिसांनी एमडी ड्रग्ज पुरवठादार अनंत जायभावेकडून तब्बल 2 लाख 70 हजारांचे 54 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. त्याला न्यायाल्याने 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Nashik MD Drugs नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा एमडी ड्रग्ज (MD Drugs) सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी सुरुवातीला दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्ज (MD Drugs Case) पुरवणारा अनंत जायभावेच्या (Anant Jaybhave) पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या.
पोलिसांनी (Nashik Police) पुरवठादार अनंत जायभावेकडून तब्बल 2 लाख 70 हजारांचे 54 ग्रॅम एमडी ड्रग्ज हस्तगत केले आहे. या टोळीच्या एमडीचे धागेदोरे मुंबईपर्यंत जात असल्याने शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथक त्या दिशेने तपास करीत आहे.
मागील आठवड्यात दोघांना अटक
शहर गुन्हेशाखेच्या पथकाने गेल्या आठवड्यामध्ये १ लाखांच्या २० ग्रॅम एमडीसह सराईत गुन्हेगार निखिल बाळू पगारे (29, रा. दादाज् अपार्टमेंट, विक्रीकर भवन, पाथर्डी फाटा), कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (22, रा. भगवती चौक, उत्तमनगर, सिडको) यांना अटक केली होती. पगारे यानेच गेल्या नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर (Social Media) एमडीच्या पुडीसह व्हिडिओ व्हायरल केला होता. तेव्हापासून पोलीस (Nashik Crime News) संशयितांच्या मागावर होते. अखेर मागील आठवड्यात दोघांना गुन्हेशाखेच्या युनिट एकने अटक केली होती.
दोन लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
तर या दोघांना एमडी पुरविणाऱ्या संशयित अनंत सर्जेराव जायभावे यास अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. तपासादरम्यान त्याच्या घरझडती घेतली असता, २ लाख ७० हजारांची ५४ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आली आहे.
25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
पोलीस कोठडीची मुदत संपल्याने जायभावेला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने येत्या २५ तारखेपर्यंत त्याच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. शहर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
एमडी ड्रग्जचे मुंबई कनेक्शन
दरम्यान, जायभावेची अधिक चौकशी केली असता तो मुंबईतून एमडी खरेदी करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जायभावे हा मुंबईतील कुठल्या रॅकेटच्या संपर्कात आहे? याचा सध्या तपास सुरु आहे. तसेच वडाळागावातील छोट्या भाभीला मुंबईतूनच एमडीचा पुरवठा होत असल्याचे याआधी समोर आले आहे.
आणखी वाचा