Nashik Citylink Bus Strike : ...अखेर सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप मिटला, शहरातील बससेवा पूर्ववत
Nashik News : वेतन न मिळाल्याने सिटीलिंकच्या तपोवन डेपोतील वाहकांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील बससेवा पुन्हा एकदा पूर्ववत झाली आहे.
Nashik Citylink Bus Strike नाशिक : वेतन न मिळाल्याने सिटीलिंकच्या (Citylink) तपोवन डेपोतील (Tapovan Depot) वाहकांनी पुकारलेला संप अखेर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी (Pradeep Chaudhary) यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर हा संप (Workers Strike) मागे घेण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी वेतनाबाबत वाहकांनी सिटीलिंक प्रशासन व ठेकेदाराकडे मागणी केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने चालकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. तपोवन डेपोतून शहरातील विविध मार्गावर सिटीलिंक बस धावतात. गुरुवारी पहाटेपासूनच बसेस बंद असल्याने संबंधित मार्गावरील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह कामगारांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे अनेकांना इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाने प्रवास करण्याची वेळ आली.
संप मागे घेतल्याने सर्व बसेस मार्गस्थ
संप मागे घेण्यात आल्याने टप्प्याटप्याने सर्वच बसेस मार्गस्थ होत आहेत. सिटीलिंकच्या संपाचा तिढा दुसऱ्या दिवशीही दुपारपर्यंत कायम होता. तपोवन डेपोतून सुटणाऱ्या अनेक बसेस जागेवरच उभ्या होत्या. आंदोलनात सुमारे 150 पेक्षा अधिक वाहक सहभागी झाले होते. त्यामुळे शालेय विद्यार्थी, चाकरमान्यांचे दुसऱ्या दिवशीही हाल झाले.
कर्मचाऱ्यांचा सातव्यांदा संप
सिटीलिंक बस ठेकेदाराने वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन थकविल्याने गुरुवारी पहाटेपासूनच वाहकांनी संप पुकारला. ठेकेदाराने वाहकांचे वेतन न दिल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. विशेष म्हणजे, शहरात सिटीलिंक सेवा सुरू झाल्यापासून वेतनावरून सातव्यांदा संप होता.
शहरातील बससेवा पूर्ववत
सातत्याने होत असलेला संप पाहून काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने सिटीलिंक ठेक्याची विभागणी केली. नागपूर येथील युनिटी नावाच्या कंपनीकडे नाशिकरोड डेपोची (Nashikroad Depot) जबाबदारी देण्यात आली आहे. मनपाने ठेकेदाराला रक्कम अदा करूनही ठेकेदाराची मनमानी सुरू असल्याने दुसऱ्या दिवशीही सायंकाळपर्यंत सिटीलिंक संप सुरू होता. नाशिकरोड डेपोतील शंभर बसेस सुरू असल्याने नाशिककरांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र तपोवन डेपोतून सुटणाऱ्या दीडशे बसेस वाहकांनी संप सुरूच ठेवला होता. शुक्रवारी जानेवारी महिन्याचे वेतन वाहकांच्या खात्यावर जमा करण्यात आले. तसेच एका महिन्याचे वेतन आठ दिवसात जमा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर वाहकांनी संप मागे घेतला. त्यामुळे आता शहरातील बससेवा पूर्ववत झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या