दिलासादायक! भारतात पडतोय पैशांचा पाऊस, परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज येतायेत 3516 कोटी
India Forex Reserve : देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.
India Forex Reserve : सध्या अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. भारताला एकामागून एक यश मिळत आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमधील जीडीपी वाढीचे आकड्यापासून ते उत्पादन क्षेत्रापासून जीएसटी संकलनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात वाढ होत आहे. आता परकीय चलनाच्या (Foreign exchange) साठ्याशी संबंधित आकडे आले आहेत. 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यापर्यंतच्या गणनेत असे दिसून आले की 7 दिवसांत देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज 3,516 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची आकडेवारी जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) दर आठवड्याला देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची आकडेवारी जाहीर करते. त्यानुसार, 23 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात 7 दिवसांत 2.97 अब्ज डॉलर्स (सुमारे 24,615 कोटी रुपये) वाढ झाली आहे. अशा प्रकारे देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज सुमारे 3,516 कोटी रुपये आले. दरम्यान, आरबीआयच्या अहवालानुसार, 23 फेब्रुवारीपर्यंत देशाचा परकीय चलनसाठा एकूण 619 अब्ज डॉलर होता. भारतीय चलनात हे अंदाजे 51,29,730 कोटी रुपये आहे. तर गेल्या आठवड्याच्या अहवालात देशाचा परकीय चलनसाठा कमी होऊन तो 616.09 अब्ज डॉलरवर पोहोचला होता.
जेव्हा जेव्हा देशाच्या परकीय चलन साठ्याची मोजणी केली जाते, तेव्हा फक्त रिझर्व्ह बँकेकडे असलेले डॉलर्स मोजले जात नाहीत. चीनचे युआन, जपानचे येन, युरोपचे युरो आणि ब्रिटनचे पौंड इत्यादी इतर विदेशी चलनांचाही यामध्ये समावेश आहे. त्यांची गणना डॉलरमध्ये व्यक्त केली जाते. त्यानुसार, 23 फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण 548.19 अब्ज डॉलर्सचे विदेशी चलन होते. एवढेच नाही तर एकूण परकीय चलनाच्या साठ्यामध्ये देशाचा सोन्याचा साठा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे ठेवलेला देशाचा पैसा आणि तेथून मिळालेला SDR यांचा समावेश होतो. SDR ही एक प्रकारची FD सुविधा आहे, जी IMF कडे जमा केली जाते आणि विशेष परिस्थितीत वापरली जाते.
देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातोय जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातोय कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं आणि विश्वासू चलन आहे.
महत्वाच्या बातम्या:
विदेशी संपत्तीनं भारताची तिजोरी भरली! महिनाभरात तिजोरीत आले 1.37 लाख कोटी; सविस्तर माहिती एका क्लिकवर