वणी-सापुतारा रस्त्यावर भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, नको ते घडलं, तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
Nashik : नाशिक जिल्ह्यातील वणी - सापुतारा रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Accident News : नाशिकसह जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी - सापुतारा रस्त्यावर आज झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात दोन तरुणीसह एका युवकाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
नाशिक वणी सापुतारा या मार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. हा मार्ग गुजरातला जोडला असल्याने दिवसभर कुठे ना कुठे अपघाताची घटना घडत असते. या घटनेत वणीकडून सापुतारा येथे जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. वाहनवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. सायंकाळी साडे चार ते पाच वाजताच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. या घटनेत समवयस्क तरुण तरुणींचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघे मित्र एका कारने वणी सापुताराकडे जात होते. वणी ते सापुतारा रोडवर चौसाळे फाट्याच्यापुढे वणीकडून सापुताराकडे जात असताना कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. वेगात असल्याने कार रस्त्याचे खाली उतरल्यामुळे अपघात होऊन कार उलटली. या अपघातात अंजली राकेश सिंग, नोमान चौधरी, सृष्टी नरेश भगत हे मयत झाले आहेत.
या भीषण अपघातात अजय गौतम हा जखमी झाला आहे. त्यास पुढील उपचाराकरिता नाशिक जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मयत व्यक्तीवर वणी ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करत आहेत.
आणखी वाचा :
Heat Wave in India : फेब्रुवारीतच उष्णतेची लाट, 122 वर्षांचा विक्रम मोडला; सरासरी तापमान 29.5 डिग्री