नरेंद्र दराडे 'तोतया आमदार', छगन भुजबळांनी केलं लक्ष्य, नाशिकमध्ये गुन्हा दाखल
Narendra Darade Case : माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्यावर तोतयागिरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यावरून मंत्री छगन भुजबळांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नाशिक : विधानपरिषदेचे माजी सदस्य नरेंद्र दराडे यांनी विद्यमान आमदार असल्याचे पत्र दिल्याने त्यांच्यावर नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिकमधील राजकारण चांगलेच पेटल्याचं चित्र आहे. येवल्यात सुरू असलेल्या शिवसृष्टीच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या या पत्रामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी माजी आमदार दराडे यांना लक्ष्य केलं आहे. तर तशा आशयाचं कोणतंही पत्र नरेंद्र दराडे यांनी दिलं नाही, त्यावरील सहीही त्यांची नसल्याचा दावा दराडेंच्या समर्थकांनी केला.
तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल
या प्रकरणी छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, नरेंद्र दराडे यांनी दिलेले पत्र मला प्राप्त झाले आहे. वास्तविक त्यांची मुदत संपल्यावरही विद्यमान आमदार म्हणून पत्र देणे अयोग्य आहे. दराडे यांनी आमदार म्हणून सही देखील केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर तोतया आमदार म्हणून गुन्हा दाखल होणारच. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करतील. अशोक स्तंभाच्या मुद्रा वापरण्याचे काही नियम आहे. त्यात माजी आमदार व माजी खासदार यांनी ती मुद्रा वापरण्याची कुठेही उल्लेख नाही. सहा वर्षे आमदार राहिलेल्या माणसाला हे कळू नये?
नरेंद्र दराडे यांनी तसे पत्रच दिलं नाही, समर्थकांचा दावा
माजी आमदार नरेंद्र दराडे बाहेरगावी असल्याने त्यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र त्यांच्या कार्यालयातील प्रमुख प्रमोद बोडके यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सदरचे पत्र माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे नाही, त्यांनी तसे पत्रही दिले नाही. जनतेच्या कामासाठी दराडे यांनी आमदार असताना काही कार्यकर्त्यांना तसे पत्र दिलेले होते. त्यापैकी कोणी एका शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी तसे पत्र दिले असावे. त्यावरील सही देखील माजी आ.दराडे यांची नाही. फॉरेन्सिक लॅबमध्ये चौकशी केली तरी सत्य बाहेर येईल. हा काही मोठा विषय नाही. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निमिताने केवळ राजकारणासाठी असे आरोप केले जातात.
शरद पवारांची येवल्यात मोठी खेळी करणार?
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. कारण छगन भुजबळ यांच्या मतदारसंघात शरद पवार काही दिवसांपूर्वी आले असता भाजप नेत्या अमृता पवार यांनी शरद पवार यांचं स्वागत केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे अमृता पवार शरद पवार गटात प्रवेश करतात का? मंत्री छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार असा सामना आगामी निवडणुकीत रंगणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: