Nashik News : नाशिकमध्ये नाथजलची वाढीव दराने विक्री, व्हिडीओ व्हायरल, महामंडळाकडून थेट परवाना रद्द
Nashik News : नाथजल (Nathjal) या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून प्रवाशांची लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे.
Nashik News : एकीकडे शहरात उन्हामुळे अंगाची लाही लाही झाली असताना नाशिकककरांची (Nashik) तहानही वाढली आहे. त्यामुळे घरात असताना, बाहेर फिरताना पाण्याचा अधिकच वापर होतो आहे. प्रवासात पाण्याच्या बॉटल्सचा सर्रास वापर होतो आहे. अशातच नाशिकरोड (NashikRoad) बसस्थानकावर एसटी महामंडळाने सुरु केलेल्या नाथजल (Nathjal) या बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून प्रवाशांची लुबाडणूक होत असल्याचे समोर आले आहे. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच एसटी महामंडळाने तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या (ST Mahamandal) माध्यमातून प्रवाशांना सोयीस्कर व्हावे म्हणून ‘नाथजल’ नावाने बाटली बंद पाण्याची विक्री केली जाते. साधारण पंधरा रुपयांना या पाण्याच्या बॉटल्सची अधिकृत विक्री केली जाते. मात्र नाशिक शहरातील नाशिकरोड बस्थानकावर मात्र परंतू अलिकडे कुलिंग चार्जच्या नावाखाली या बाटल्यांमागे पाच रूपये अतिरिक्त चार्ज आकारून नाथजलची विक्री केली जात आहे. नाथजल बाटली बंद पाण्याची विक्री चक्क 20 रूपयांना केली जात आहे. याबाबत नाशिकरोड बसस्थानकातील संबंधित नाथजल विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यात संबंधित पाणी बॉटल विक्रेती महिला ग्राहकाशी संवाद साधताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर एसटी महामंडळाने त्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
दोन दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ असून या व्हिडिओत एक महिला ग्राहक पाणी बॉटल विक्रेत्या महिलेशी संवाद साधताना दिसत आहे. तत्पूर्वी विक्रेत्याने संबंधित महिलेला पंधरा रुपयांची पाणी बॉटल्स वीस रुपयांना दिल्याचे व्हिडिओतून निदर्शनास येत आहेत. याचाच जाब विचारण्यासाठी महिलेने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यामध्ये विक्रेती महिला अरेरावीची भाषा करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर महामंडळाने संबंधित व्हिडिओची दाखल घेत पाण्याची निर्धारित किमतीत विक्री न करता वाढीव भावात विक्री करणाऱ्या व त्याबाबत विचारणा करणाऱ्या एसटी प्रवाशांशी असभ्य वर्तवणूक करणाऱ्या नाशिकरोड बस स्थानकावरील स्टॉल प्रतिनिधीचा परवाना रद्द करण्याचे व त्याच्या जागी तात्काळ प्रभावाने नवीन प्रतिनिधीची नियुक्ती करण्याचे आदेश एसटीच्या नियोजन आणि पणन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.
महिला विक्रेत्याचा परवाना तातडीने रद्द
एका महिला ग्राहकाने याबाबतची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियाद्वारे व्हायरल केली होती. त्यात 'नाथजल' स्टॉलमध्ये असणारी महिला प्रतिनिधी या प्रवाशाशी अर्वाच्य भाषेत संभाषण करत होती. ही व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रती जनमानसात असलेली प्रतिमा मलिन होत असल्याचे कारण देत एसटीच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाने नाशिक रोड येथील नाथजल विक्रीचा सदर प्रतिनिधीचा परवाना तातडीने रद्द करण्याची निर्देश मे. शेळके बिवरेजेस या कंपनीला दिले आहेत. सदर प्रतिनिधीच्या ताब्यातून स्टॉल रिकामा करून घ्यावा व त्याला तातडीने जागेचा ताबा सोडण्यास सांगावे. तसेच तात्काळ प्रभावाने अन्य प्रतिनिधीची तेथे नियुक्ती करावी असे एसटीच्या नियोजन व पणन महाव्यवस्थापकांनी आदेशात नमूद केले आहे.