Nashik Eknath Shinde : 'मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नाही', मुख्यमंत्री शिंदे यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर
Nashik Eknath Shinde : शेतकऱ्यांचे राज्य असून यांच्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.
Nashik Eknath Shinde : "एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हा सर्व सामान्य कार्यकर्ता आहे, मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नाही. आम्ही योग्य प्रश्नाला न्याय देऊ, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, हे शेतकऱ्यांचे राज्य असून यांच्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही," असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीकेला दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी शिंदे भाजप (BJP) सरकारवर टीका केली. राज्यात जनतेचे प्रश्न असताना मंत्रिमंडळ अयोध्येला (Ayodhya Tour) गेले आहे. जनतेचे मूळ प्रश्न वगळून, धर्म, जात यावर आधारित एक वेगळं सामाजिक चित्र निर्माण करणे आणि कष्टकरी बांधव मूलभूत प्रश्न यापासून बाजूला कसा राहिल, याची काळजी घेतली जात आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री शिंदे हे नाशिक दौऱ्यावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मूळ प्रश्नांना बगल देणारा कार्यकर्ता नसल्याचे शिंदे म्हणाले.
गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात (Nashik District) अवकाळी पावसाने (Unseasonal rain) कहर केला असून त्यामुळे काही भागात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर गेल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. त्यानंतर अयोध्या दौऱ्यावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील शेतशिवार गाठलं. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत त्यांनी पाहणी करत शेतकऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी ते बोलत होते. "शेतकऱ्यांना कुठेही पडू देणार नाही, हे शेतकऱ्यांचे राज्य असून यांच्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही, शेतकऱ्यांनी निश्चित राहा, शेतकऱ्यांना मदत मिळणारच," असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले.
कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, मागच्या एक दोन महिन्यात जे नुकसान झालेलं आहे. ते जवळपास 177 कोटी रुपयांचं असून ते सगळे पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी हा मायबाप असून तो सगळ्यांना जगवतो आहे. अयोध्येला जाऊन शेतकऱ्यांसाठी हेच मागणे मागितले की, शेतकऱ्यांवरचे सगळे संकट दूर होऊ देत. शिंदे भाजप सरकारने यापूर्वी देखील शेतकऱ्यांना मदत केली आहे. कांद्याला 350 रुपये अनुदान दिले आहे. आज बागलाण तालुक्यातील तीन गावातील नुकसान पाहणी करण्यात आली, कांदा, द्राक्ष, पपईचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वच पिके वाचली पाहिजेत, ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत होईलच. यासाठी सर्व जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून तात्काळ या सर्व नुकसानीचे पंचनामे होणार आहेत. कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी करुन पंचनामे करावेत, त्याचा अहवाल सादर करावा, त्यानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल, असेही शिंदे यावेळी म्हणाले.
विरोधकांना सडेतोड उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर विरोधी पक्षाकडून आम्हाला देखील राम महत्वाचा आहे. आम्हीही जाऊ, असे म्हटले आहे. यावर शिंदे म्हणाले की, ठीक आहे, स्वागत आहे. खरं म्हणजे हे बोलायला तर लागले, ज्यांनी राम मंदिराला विरोध केला. ते बोलायला तर लागले, आम्ही पण जातोय म्हणून, सगळ्यांना कामाला लावलं आहे. फिरायला लागल्यानंतर सगळे फिरायला लागले. देवदर्शनाला जायला लागले, त्यामुळे देवदर्शन घेणाऱ्यांची संख्या वाढली. आज आम्ही पाहणी दौऱ्यावर आलो आहोत, गारपीट परवा झाली, गारपीट व्हायच्या आधी यायचं होतं का? विरोधकांना काही काम धंदा आहे का? त्यांनी जो निर्णय घेतला, त्यांचे पैसे आम्ही दिले. कुणाला काही बोलू द्या...आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणार असून अयोध्येहून श्रीराम रामांचे दर्शन घेतल्यानंतर आता कामाला सुरुवात झाली असल्याचे शिंदे म्हणाले.